पिंपरी: संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे. कोणी कशा पद्धतीने काम करायचे. कोणी कसे बोलायचे, कसे वागायचे, हे त्यांनी ठरवायचे आहे. ते करताना यशवंतराव चव्हाण यांची शिकवण विसरू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्याबद्दल बोलताना दिला.
उपमुख्यमंत्री पवार हे शनिवारी (दि.20) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना वापरलेल्या भाषेवरून ते म्हणाले की, संविधानाने सर्वांना अधिकार दिला असून कोणी कशा पद्धतीने काम करायचे हे ठरवावे. पवार कुटुंबाच्या मनोमिलनाच्या चर्चेवर त्यांनी मत प्रदर्शन केले नाही. (Latest Pimpari chinchwad News)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांबाबत तो फेक नरेटिव्ह असल्याची टीका पवारांनी केली. ते म्हणाले की, विरोधक जिंकले की मतांची चोरी होत नाही. ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित होत नाही. मात्र, त्यांचा पराभव झाला की मग ते फेक नरेटिव्ह सेट करतात. संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्हमध्ये अपयश आले, म्हणून आता निवडणुका झाल्यानंतर एका वर्षाने फेक नरेटिव्ह सेट करत आहेत.
एससी आणि एसटीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा सर्वाधिक अधिकार केंद्राला आहे. अनेक घटकांना समाविष्ट करून घेण्याची मागणी होते. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले जातील, असे ते एका प्रश्नावर म्हणाले.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत देशात दोन मतप्रवाह आहेत. तो ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात निष्पाप लोकांचा त्या हल्ल्यात जीव गेला ही बाब ताजी आहे. त्यानंतर हा खेळाचा प्रकार पुढे आला आहे.
महापालिकेने दापोडी ते निगडी मार्गावरील अर्बन स्ट्रीट डिजाईन रस्ते अरुंद केलेले नाहीत. पदपथामध्ये पार्किंगची ठराविक ठिकाणी सोय केली आहे. नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये वाहने पार्क करावी. रस्त्यावर वाहने लावू नयेत. सर्वांना प्रवास सुखकर होईल, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला.
शहरात गाठीभेटी घेत संपर्क साधत आहे
राजकारणात काम करताना सर्वांशी संपर्क ठेवावा लागतो. अडीअडचणी समजून घ्यावा लागतात. मी अनेक वर्षे या शहराचे नेतृत्व केले. सन 2017 चा अपवाद वगळता, शहराने मला 25 वर्षे पूर्ण पाठिंबा दिला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी काम केले आहे, हे सर्वांना माहीत आहे. शहरात संपर्क साधण्यासाठी व गाठीभेटी घेण्यासाठी परिवार मिलन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याला महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पाहणे योग्य नाही,असे अजित पवार म्हणाले.