पिंपरी: आम आदमी पार्टी आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढणार नाही. आप स्वबळावर सर्व 32 प्रभागांंत लढणार आहे, असे आपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी घोषणा केली आहे.
लोकसभा व विधानसभेत महाविकास आघाडीसोबत असलेली आम आदमी पार्टी महापालिका निवडणुकीस स्वतंत्रपणे सामोरे जाणार असल्याने महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Pimpri News)
पक्षाची बैठक शनिवारी (दि.19) मोरवाडी, पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये झाली, त्या ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रविराज काळे, महासचिव सचिन पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. अनिल रॉय, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत पक्षाच्या नवनियुक्त शहर पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच, काही पदाधिकार्यांनी पक्षात प्रवेश केला. आपमध्ये अॅड. के. एम. रॉय, ओबीसी समाजाचे राहुल मदने, सामाजिक कार्यकर्ते विकी पासोटे, शुभम गाडेकर यांनी पक्षप्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार म्हणाले, की आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. महाविकास आघाडीसोबत पक्ष लढणार नाही. सर्व 32 प्रभागांत लढण्यासाठी तयारीस लागावे, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. शहराध्यक्ष रविराज काळे म्हणाले, की आम आदमी पार्टी हा पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये भक्कम पर्याय म्हणून उभा राहणार आहे. येत्या महापालिका निवडणुकीत आपचा झेंडा पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक भागात नक्कीच फडकणार आहे.