Pimpri Rain Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Rain: पहिल्याच पावसात दाणादाण; अवघ्या तासाभरात शहर जलमय

शहरातील काही भागांमध्ये ड्रेनेजच्या झाकणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. 22) झालेल्या केवळ 32 मिनिटांच्या पावसाने अनेक भाग जलमय झाले. नाले तुडुंब भरल्याने ड्रेनेजची झाकणे उघडली गेली. तसेच, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक भागांतील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाल्यामधील पाण्याचा प्रवाह मंदावला

पावसाचा जोर वाढताच शहरातील अनेक प्रमुख नाले आणि स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था अपुरी पडल्याचे चित्र दिसून आले. नाल्यांमधील साचलेला गाळ, कचरा, झुडपे आणि वेळेत न उचललेला राडारोडा यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला होता.

परिणामी पाणी रस्त्यांवर साचू लागले. अनेक ठिकाणी नाले भरून वाहू लागल्याने गटारांचे पाणी थेट रस्त्यावर आले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून दुचाकीस्वार, वाहनचालक आणि पादचारींना मोठी कसरत करत मार्ग काढावा लागला.

अपघाताचा धोका

चिखली, देहूरोड, निगडी, कासारवाडी, आळंदी आणि पिंपरी समाट चौक परिसरात परिस्थिती अधिक गंभीर होती. काही भागांमध्ये रस्ते आणि नाले यामधील फरकच ओळखणे कठीण झाले होते. पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक चौक आणि अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले. काही वाहनांचे इंजिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. तर, अनेकांना वाहन ढकलत सुरक्षित स्थळी न्यावे लागले. अनेक ठिकाणी नाल्यांमधील पाणी थेट रस्त्यावर आल्याचे दिसून आले. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरात दुर्गंधी

शहरातील काही भागांमध्ये ड्रेनेजच्या झाकणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते. गटारातील घाण, प्लास्टिक, कचरा आणि चिखल रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना अक्षरशः दूषित पाण्यातून चालावे लागले. यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि त्वचारोगांसारख्या साथींचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

नालेसफाईच्या कामावर शंका

महापालिकेकडून नालेसफाईचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, शहरातील सुमारे 70 टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, अवघ्या 32 मिनिटांच्या पावसातच शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रत्यक्षात नालेसफाई कितपत प्रभावी झाली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

शहरवासीयांमध्ये प्रशासनाच्या तयारीबाबत तीव नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाने ही अवस्था असेल तर, पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती किती गंभीर होईल, याची चिंता नागरिकांना सतावत आहे. शहरातील पूरप्रवण भाग, तुंबलेले नाले, अतिक्रमणांनी अरुंद झालेले प्रवाह आणि अपुऱ्या स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. अन्यथा प्रत्येक पावसात शहरवासीयांना याच समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

पावसाने उघड केलेले वास्तव

  • अनेक भागांमधील नाले तुडूंब भरले

  • ड्रेनेजची झाकणे उघडून गटारयुक्त पाणी रस्त्यावर

  • प्रमुख चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले

  • दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय

  • तुटलेल्या कठड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

  • नालेसफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

हे प्रश्न अनुत्तरितच

  • अवघ्या काही मिनिटांच्या पावसात शहर जलमय कसे?

  • नालेसफाईचे कोट्यवधी रुपये नेमके खर्च कुठे झाले?

  • ड्रेनेज झाकणे उघडून गटाराचे पाणी रस्त्यावर का आले?

  • तुटलेले कठडे आणि अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का?

  • पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे दावे फक्त कागदावरच होते का ?

महापालिका दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, केवळ काही मिनिटांच्या पावसातच शहरातील रस्ते जलमय झाले. गटाराचे पाणी रस्त्यावर आले. मग, नालेसफाई नेमकी कुठे झाली? पावसामुळे रस्ता व गटारयुक्त नाला ओळखणे कठीण झाले आहे.
- राहुल कुलकर्णी, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT