महापालिकेच्या 30 शाळा मुख्याध्यापकांविना File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Municipal School: महापालिकेच्या 30 शाळा मुख्याध्यापकांविना

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नती स्वीकारत नसल्याने सुमारे 30 शाळा मुख्याध्यापकांविनाच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करायची, शिकवायचे अन्‌‍ व्यवस्थापनही पाहायचे अशी तारेवरची कसरत सुरू आहे.

महापालिकेच्या प्राथमिकच्या 105 शाळा आहेत. त्यांपैकी सुमारे 30 शाळांना मुख्याध्यापक नाहीत. त्यामुळे या शाळांवर आता प्रभारी मुख्याध्यापक नेमण्यात आले आहेत. दुसरीकडे पदोन्नती स्वीकारून मुख्याध्यापक होण्यासाठी शिक्षक असमर्थता दर्शवित असल्याचा दावा शिक्षण विभाग करत आहे. (Latest Pimpri News)

या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या तासिकेवर परिणाम होत आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी मुख्याध्यापकांची नियुक्ती झालेली नाही. तर, मागील वर्षभरापासून मुख्याध्यापकांची तब्बल 84 पदे सेवानिवृत्ती वा अन्य कारणांमुळे रिक्त झाली आहे. शिक्षकांमधूनच पदोन्नतीने ही पदे भरण्याची प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू झालेली आहे.

यासाठी शिक्षण विभागाने सेवाज्येष्ठतेनुसार यादी बनविली आहे. यातील केवळ शिक्षकांनीच पदोन्नती स्वीकारली व अन्य शिक्षकांनी पदोन्नतीला नकार दिला. काही कारणांचा ऊहापोह करत आपण आहोत त्याच ठिकाणी सेवा देणार असल्याचे प्रशासनाला सांगितले.

ही जबाबदारी इतर शिक्षकांवर सोपविल्याने त्यांना शिकवण्याचे काम सोडून इतर कामे करावी लागत आहे. यात गणवेश वाटप, खिचडीचे नियोजन, शालेय समितीच्या विविध बैठका याकडे अधिक लक्ष द्यावे लागत आहे. लवकरात लवकर ही पदे भरली गेल्यास शाळांना मुख्याध्यापक मिळेल ज्या शिक्षकांना सद्य:स्थितीत मुख्याध्यापकांचे काम करावे लागत आहे त्यांची यातून सुटका होईल, असे येथील शिक्षक सांगत आहेत.

उपशिक्षकांकडे मुख्याध्यापकांचे पदभार

शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्यामुळे शाळेतील वरिष्ठ शिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी देऊन काम भागविण्यात येत आहे. नियमाप्रमाणे 100 च्यापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापक असणे बंधनकारक आहे. काही शाळांमध्ये शाळेतील उपशिक्षकांकडे मुख्याध्यापकांचे पदभार दिलेले आहेत.

शिक्षकांमधूनच पदोन्नतीने ही पदे भरण्याची प्रक्रिया जूनपासून सुरू झालेली आहे. यासाठी शिक्षण विभागाने सेवाज्येष्ठतेनुसार यादी बनविली आहे. शिक्षकांना बोलविण्यात येत आहे. अनेक मुख्याध्यापकांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे.
संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT