पिंपरी: पावसाळा सुरू असल्याने पवना नदीत मोठ्या प्रमाणावर गढूळ पाणी येते. ते पाणी रावेत येथील बंधार्यातून उचलून शुद्ध केले जाते. त्यानंतर ते शहरातील नागरिकांना पुरवले जाते. ते गढूळ पाणी अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यासाठी 3 कोटी 13 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. त्याला खर्चास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
शहराला पवना व आंद्रा धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीमधून रावेत बंधार्यातून पाणी उचलून निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध केले जाते. आंद्रा धरणातील पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदीच्या बंधार्यातून उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये ते शुद्ध केले जाते. तेथून ते शुद्ध पाणी शहराला पुरवले जाते. (Latest Pimpri News)
गढूळ पाणी शुद्ध करण्यासाठी रसायन पॉली अॅल्युमिनियन क्लोराईड द्रवरुप व पावडर स्वरुपात वापरले जाते. त्याच्या खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबवण्यात आली. निविदेतील अटी शर्तीनुसार, आवश्यकता भासल्यास त्याच दराने वाढीव रसायने पुरवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर देण्यात आली होती. त्यानुसार, एसव्हीएस केमिकल्स कार्पा एलएलपी आणि गुजरात अल्कलीज अॅण्ड केमिकल्सकडून द्रवरुप व पावडर स्वरुपात रसायने घेण्यात येणार आहे.
त्यासाठी 3 कोटी 13 लाख 12 हजार 496 रुपये खर्च होणार आहे. त्यास स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. महापालिका भवनातील कँटीनचे भाडे 38 लाख रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारातील कॅँटीन (उपाहारगृह) पाच वर्षे भाडे तत्त्वावर चालविण्यासाठी दिले आहे. त्यापोटी पाच वर्षांसाठी महापालिकेस 38 लाख 5 हजार 115 रुपये भाडे मिळणार आहे.
कँटीनचे क्षेत्रफल 590.19 चौरस फूट आहे. कँटीन चालविण्यासाठी 5 वर्षांसाठी 31 लाख रुपये भाड्याची ई-निविदा काढण्यात आली होती. त्यासाठी माऊली हॉटेल, सुरूची केटरर्स, श्री शिवसमर्थ एंटरप्रायजेस आणि श्री रामदेवजीबाबा बचत गट महिला मंडळ असे चार ठेकेदारांचे दर प्राप्त झाले. सर्वांनी 36 लाख ते 38 लाख रुपये दर सादर केले होते. त्यातील माऊली हॉटेलचा 38 लाख 5 हजार 115 रुपयांचा भाडेदर स्वीकृत करण्यात आला.
माऊली हॉटेला महापालिकेच्या आवाराती कँटीन चालविण्यास भाडे तत्वार देण्याचा भूमि आणि जिंदगी विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वासाठी तब्बल 55 लाखांचा खर्च
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे 1 ते 5 ऑगस्टदरम्यान आयोजन करण्यात येणार आहे. त्यात विविध प्रबोधनात्मक, गायन तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यावर तब्बल 55 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन केले जाते. त्यात प्रबोधनात्मक चर्चासत्र, व्याख्यान, परिसंवाद, पोवाडा, गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. तसेच, लोकगीत, नाटक, हलगीवादन, बॅण्डवादन स्पर्धा, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते.
कार्यक्रमात सहभागी वक्ते, कलाकार, निवेदक यांचे मानधन, भोजन, फराळ, चहातसेच, मंडप उभारणी, स्पीकर व्यवस्था, पुस्तक खरेदी यासाठी तब्बल 55 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
रावेतमधील लाभार्थ्यांना किवळेत सदनिका
रावेत गृहप्रकल्पासाठी महापालिकेने 27 फेब्रुवारी 2021 ला सोडत काढली. नागरिकांकडून 5 हजार रुपये नोंदणी शुल्क घेतले. त्यांना अद्याप घरे मिळालेली नाही. तेथील लाभार्थ्यांना आता किवळे येथील 755 सदनिकेच्या गृहप्रकल्पातील सदनिका देण्यात येत आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांना 7 लाखांऐवजी 13 लाख रुपये भरावे लागत आहेत. मात्र, किवळे प्रकल्पास अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.