नाशिक : पायलट क्लासरूममध्ये संगणकावर शिक्षण घेताना मनपाचे विद्यार्थी 
Latest

नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक महापालिकेच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत करण्यात आली. शाळा क्रमांक ४३ मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या या क्लासरूमला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना क्लासरूम कार्यरत करण्याचा मनपाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

नाशिक महानगरपालिकेच्या 'स्मार्ट स्कूल' या महत्त्वाच्या प्रकल्पांतर्गत नाशिक स्मार्ट सिटीमार्फत ६९ शाळांचे ६५६ वर्ग डिजिटलाइज होणार आहेत. येत्या ऑगस्टअखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 'स्मार्ट स्कूल' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे मनपाच्या शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, काठे गल्ली येथील मनपा शाळा क्र. ४३ मध्ये आठ स्मार्ट पायलट क्लासरूम सुरू करण्यात आले असता, मुलांनी वर्गात बसून ई-क्लासचा आनंद लुटला. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, डाएट संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याते शिवाजी औटी, विषय तज्ज्ञ प्रल्हाद हंकारे उपस्थित होते.

या क्लासरूममध्ये पारंपरिक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड, नवीन बेंचेस, इंटरनेट कनेक्शन, डिजिटल अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा आहे. पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. क्लासचे नव्याने रंगकाम करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शाळेत २१ संगणकांचा एक कक्ष विकसित करण्यात आला आहे. उर्वरित ६८ शाळांमध्ये याच धर्तीवर काम प्रगतिपथावर आहे.

मिशन ॲडमिशन मोहीम

मनपा शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी सध्या मनपातर्फे 'मिशन ॲडमिशन' मोहीम राबविली जात आहे. सर्व शाळांची पटसंख्या जास्तीत जास्त वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गात किमान ५० विद्यार्थी असे उद्दिष्ट मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला देण्यात आले आहे. मनपाच्या प्राथमिक ८८ आणि माध्यमिक १२ अशा एकूण १०० शाळा आहेत. सुमारे २९ हजार पटसंख्या आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबवून पटसंख्या ५० हजारपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण ८९६ शिक्षक असून प्राथमिकचे ८३८ आणि माध्यमिकचे ५८ शिक्षक आजमितीस कार्यरत आहेत. दरम्यान, बहुतांश शाळांमध्ये मोफत गणवेशाचे आणि पुस्तक वाटपाचे काम सुरू आहे. तसेच नजीकच्या काळात मनपा शाळेतील सर्व साधारण प्रवर्गातील विद्यार्थांनाही मनपामार्फत गणवेश पुरविण्यात येणार आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT