मुंबई; पुढारी ऑनलाईन : एकनाथ शिंदे आणि अन्य बंडखोर शिवसेना आमदारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांनी त्यांच्या कार्यालयीन कर्तव्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना कार्यालयीन कामकाजात पुन्हा रुजू होण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.
राज्यातील राजकीय संकटाचा आजचा सातवा दिवस आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीतील पंचताराकिंत हॉटेलमध्ये तळ ठोकून बसले आहेत. दरम्यान, राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. शिवसेनेकडून गटनेते पदी करण्यात आलेली अजय चौधरी यांची नियुक्तीला देखील याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. चौधरी यांच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्ती वर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.
विशेष म्हणजे शिंदे यांच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाच्या अपात्रतेसारख्या निर्णयावर बंडखोर आमदारांनीही आव्हान दिले आहे. सुनील प्रभू यांच्या मुख्य प्रदोत पदी नियुक्तीलाही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. याचिकेद्वारे शिंदे गटाने थेट विधानसभा उपसभापतींच्या कार्यक्षेत्राला आव्हान दिले आहे.