पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Parvez Muzaffar) सध्या गंभीररीत्या आजारी आहेत. त्यांची प्रकृती सुधारण्याच्या पलीकडे असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांना ॲमिलॉयडॉसिस (amyloidosis) हा दुर्मिळ प्रकारचा आजार झालेल्या असून त्यातून रुग्ण बरा होऊ शकत नाही.
परवेज मुशर्रफ (Parvez Muzaffar) यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. "ते व्हेंटिलेटरवर नाहीत. गेली ३ आठवडे ते रुग्णालयात आहेत. ॲमिलॉयडॉसीस या आजारमुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्याच्या शरीरातील विविध अवयव नीट काम करत नाहीत. अशा स्थितीतून प्रकृतीत सुधारण होणे अशक्य आहे. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी," असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Amyloidosis म्हणजे नेमके काय?
Amyloidosis हा दुर्मीळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार आहे. सर्वसाधारण नसलेल्या एका प्रकारच्या प्रोटिनमुळे ही गुंतागुंतीची स्थिती तयार होते. या प्रोटीनचे नाव ॲमिलॉइड असे आहे. हे प्रोटीन शरीरातील सर्व अवयवांत आणि ऊतींमध्ये जमा होते. मेंदू, हृदय, यकृत अशा विविध अवयवांत या प्रोटीनचे थर जमा होत जातात. यामुळे शरीरातील अवयव आणि ऊतींचे काम बिघडून जाते. मुशर्रफ यांना २०१८ मध्ये हा आजार असल्याचे निष्पन्न झाले होते.