Latest

पुणे : धर्माचे राजकारण जनता खपवून घेणार नाही : खा. शरद पवार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात सध्या धर्माच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण राज्यातील जनता हे खपवून घेणार नाही. देशातील वातावरण बदलत असून, आधुनिकता आणि विज्ञानाची जोड देत एकसंध राहण्यासाठी अशा प्रकारचे राजकारण परतवून लावू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केले.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित संभाजी ब्रिगेड केडर कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमांतर्गत 'महाराष्ट्र धर्म वाचवावा' या विषयावर ते बोलत होते. या वेळी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, आमदार रोहित पवार, अतुल बेनके, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जयश्री शेळके यांसह मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'तरुणांनी राजकारणात येण्याऐवजी व्यवसाय- उद्योगाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे. केंद्राबरोबर राज्यात राजकारणाला चुकीचे वळण लागले आहे. हे वातावरण महाराष्ट्राच्या जनतेला सहन होणारे नाही. त्यामुळे आतापासूनच वातावरण बदलत आहे. तरुणाई ही देशाची शक्ती असून, आपण एकत्र येऊन राज्यातील हे चित्र बदलू शकतो.' सध्या बहुजन समाजातील युवा पिढीला उद्योग व्यवसायाबरोबरच अर्थकारणाची जाण करून देणे गरजेचे आहे. संघटना या समाजकारण आणि राजकारण करणार्‍या असतात. मात्र, संभाजी ब्रिगेड यी संघटनेने राजकारणाच्या चाकोरीबाहेर राहूनही वेगळी वाट धरली. याचीच सध्या गरज असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले.

2024 मध्ये भाजपा निवडून येणार नाही…

देशात भाजपच्या अन्यायाविरुद्ध इंडिया नावाने वेगळे संघटन उभे राहत आहे. यामध्ये 12 ते 13 पक्ष अजून आलेले नाहीत. त्यांना एकत्र आणून इंडियाचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे. देशात फक्त तेच हे कार्य करू शकतात. 2024 मध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपा निवडून येणार नाही, असा विश्वास बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी व्यक्त केला.

पहिली महिला मुख्यमंत्री देऊ…

प्रश्नोत्तराच्या संवादामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करीत असताना अद्यापही महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही, या प्रश्नावर पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री असताना महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा पहिला कायदा माझ्या कारकिर्दीत केला. आता ते 50 टक्क्यांपर्यंत गेले आहे.' ही मागणी रास्त असून, लवकरच महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देऊ, असे आश्वासन पवार यांनी या वेळी दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT