Latest

नगर: पारनेरकरांना लवकरच मुबलक पिण्याचे पाणी;

अमृता चौगुले

पारनेर: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पारनेरचा शाश्वत पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार नीलेश लंके त्यासाठी पाठपुरावा करीत असून, योजनेच्या पंपिंग स्टशेनसाठी ढवळपुरी येथील थोरात कुटुंबाने त्यासाठी अवघ्या एक रुपयांचा मोबदला घेऊन सहा गुंठे जागेचे खरेदीखत दिले आहे.

पारनेर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होऊन सुमारे सात वर्षे झाली. परंतु शहराला शाश्वत पाणीपुरवठा होत नसल्याकारणाने आजही मध्यमवर्गीय, नोकरदार अधिकारी नगर, शिरूर व सुपा येथे वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे पारनेरची बाजारपेठ ओस पडली असून, अजूनही शहर नव्हे, तर खेडेगावाचा चेहरा शहराचा दिसून येत आहे. परंतु आमदार लंके आमदार झाल्यानंतर त्यांनी पहिले महत्त्वाचे काम हाती घेतले ते पारनेर शहराला शाश्वत पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याचे.

काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार पिंपळनेर येथे आले असता, त्यांनी पारनेरच्या पाणी योजनेस तत्त्वतः मंजुरी दिली. तत्काळ पाठपुरावा करण्याचे आदेश आमदार लंके व पारनेर नगरपंचायतीला दिले. 2022 मध्ये जेव्हा पारनेर नगर पंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. त्यावेळेस पहिले काम या पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्षात सुरू झाले.

पारनेरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांच्या अभ्यासू पाठपुराव्यातून ही योजना प्रक्रिया पूर्णत्वास जात आहे. शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार लंके यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर लगेच पाठपुरावा सुरू केला होता. कोरोना संकटामुळे हा प्रश्न लांबणीवर पडला. मात्र, कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर या मागणीस चालना मिळाली.

नगरपंचायतीचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर या योजनेस पारनेर शहराच्या पाणीयोजनेसाठी ढवळपुरी येथील थोरात कुटुंबाने बुधवारी सहा गुंठे जागा विनामोबदला खरेदीखताने नगरपंचायतीच्या नावे करून दिली. योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीटंचाई भासू नये, यासाठी थेट मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ढवळपुरी येथे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्यासाठी गंगाराम महादू थोरात, अलका सुभाष थोरात, गऊबाई सुभाष थोरात, नंदा जयवंत खताळ, मंदाबाई भिकाजी होडगर, शहाबाई महादू थोरात यांनी आमदार लंके यांच्या शब्दाखातर सहा गुंठे जागा खरेदीखताने नगरपंचायतीच्या नावावर करून दिली.

ढवळपुरी सेवा संस्थेचे अध्यक्ष भागाजी गावडे यांनी त्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचे पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते यांनी सांगितले.पंपिंग स्टेशनवरून कुंभारवाडी येथील फिल्टरप्लॅन्टमध्ये पाणी येणार आहे. तेथून पारनेर शहर तसेच वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. फिल्टर प्लॅन्टसाठीही कुंभारवाडी येथील नबाबाई औटी, आनंदा औटी, संभाजी औटी, धोंडीभाऊ औटी, भास्कर औटी यांनी तब्बल 32 गुंठे जागा विनामोबदला यापूर्वीच नगरपंचायतीच्या नावे करून दिले आहे.

बुगेवाडी येथे पाण्याच्या साठवण टाकीसाठी प्रवीण कावरे यांनी विनामोबदला 2 गुंठे जागा दिली आहे. सर्व दानशूर व्यक्तींचे आमदार लंके, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते, आरोग्य समितीच्या सभापती डॉ. विद्या कावरे, बांधकाम समितीचे सभापती नितीन आडसूळ, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रियंका औटी, नगरसेवक अशोक चेडे, भूषण शेलार, सुप्रिया शिंदे, निता औटी, हिमानी नगरे, श्रीकांत चौरे यांनी आभार मानले आहेत.

थोरात कुटुंबाकडून एक रुपयात सहा गुंठे जागा

सुमारे सत्तर कोटी रुपये खर्चाच्या पारनेर शहराच्या पाणी योजनेच्या पंपिंग स्टेशनसाठी ढवळपुरी येथे जागा उपलब्ध व्हावी, त्यासाठी आमदार लंके यांनी साद घालताच, ढवळपुरी येथील थोरात कुटुंबीयांनी अवघ्या एक रुपयाच्या मोबदल्यात सहा गुंठे जागा पारनेर नगरपंचायतीच्या नावावर करून दिली. आमदार लंके यांनी थोरात कुटुंबाला या जागेसाठी शब्द टाकला होता. तो शब्द प्रमाण मानून या कुटुंबाने बुधवारी पारनेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात येत अवघ्या एक रुपयाच्या मोबदल्यात खरेदीखत करून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT