पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली: सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरुन घातलेल्या गदारोळामुळे संसदेत सोमवारी कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. राज्यसभेत गोंधळातच कॉम्पिटिशन सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. संसदेचे कामकाज 5 एप्रिल पर्यंत तहकूब झाले आहे.(Parliament Session 2023)
पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रध्दांजली वाहून लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी तर लंडनमध्ये केलेल्या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, असे सांगत सत्ताधाऱ्यांनी उभय सदनात प्रचंड गदारोळ घातला. यामुळे प्रथम कामकाज दुपारी दोन वाजता आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेत अनेक विरोधी खासदारांनी काळे कपडे परिधान केले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाला 13 मार्च रोजी सुरुवात झाली होती. तेव्हापासून एकही दिवस धडपणे कामकाज चालू शकलेले नाही. सोमवारचा दिवसही त्याला अपवाद राहिला नाही. दरम्यान राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या मुद्द्यावर काॅंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसद आवारात प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या आदेशावर आम्हाला युक्तिवाद करायचा नाही. पण केंद्र सरकारविरोधातील लढा यापुढेही चालूच राहील, असे खर्गे यांनी सांगितले.
हेही वाचा