पुढारी ऑनलाईन डेस्क : अरवलीच्या डोंगररांगांमध्ये प्राचीन खजिना सापडला आहे. सोहना (हरियाणा) येथील बादशापूर टेथर गावाजवळ सापडलेल्या या कातळशिल्पांवर कोरलेल्या मानव आणि प्राण्यांच्या हात आणि पायाचे ठसे आहेत. ही कातळशिल्प बनवण्यासाठी वापरलेली अनेक साधने घटनास्थळी सापडली आहेत. (Paleolithic Age) हे ठिकाण एका टेकडीवर असून, मांगरपासून सहा किलोमीटर अंतरावर असल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
पुरातत्व विभागाला दोन किमी त्रिज्यामध्ये पसरलेले पाषाणकालीन कोरीवकाम सापडले आहे. पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संशोधक असलेले सुनील हरसाना यांनी पुरातत्व विभागाला अश्मयुगीन काळातील कोरीव काम असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांची सखोल तपासणी करण्याची विनंती केली आहे. रविवारी (दि.५) पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने पुष्टी केली आहे की, सापडलेले खडक पाषाण काळातील आहेत.
हरियाणा पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक बनानी भट्टाचार्य यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले की, "हे कातळशिल्प भारतीय प्रागैतिहासिक इतिहासाची उल्लेखनीय उदाहरणे आहेत. ते मानवी सभ्यतेची प्रगती दर्शवतात. माझा विश्वास आहे की, हे कोरीव काम १०,००० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन असावे; पण सर्वेक्षणानंतरच याची वस्तुनिष्ठ माहिती समोर येईल." सापडलेल्या कातळशिल्पावर बहुतेक कोरीव काम प्राण्यांचे पंजे आणि मानवी पावलांचे ठसे आहेत. काही मूलभूत चिन्हे आहेत, जी बहुधा काही खास हेतूने ठेवली गेली असावीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) च्या सल्लागार दिव्या गुप्ता यांनी सांगितले की, "ही कातळशिल्प (Petroglyphs) अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण याच्या अभ्यासाने आपण पुरातनता प्रागैतिहासिक काळापर्यंत जाऊ शकतो. ही कातळशिल्प कोणत्या काळातील आहेत हे या क्षणी अचूकपणे सांगणे कठीण आहे; पण त्यावर पुढील अभ्यास व्हायला हवा.
पुरातत्व विभागाचे अधिकारी एम.डी सिन्हा यांनी सांगितले की, "लवकरच या परिसराचे विस्तृत सर्वेक्षण करण्यात येईल. हा प्रदेश प्राचीन मानवी संस्कृतीचा स्पष्ट करणारा आहे. सरस्वती-सिंधू संस्कृती पाहिली तर तिचे संपूर्ण चक्र याच पट्ट्यात सुरू झाले. वेदपूर्व आणि वैदिक अस्तित्वाचे पुरावे देखील आहेत. आम्ही पुढील संशोधनासाठी सर्वेक्षण करू."
हेही वाचा :