Latest

PAKvsNZ Test : पाकिस्तानची इज्जत पणाला, न्यूझीलंडविरुद्ध बाबरचा संघ अडचणीत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAKvsNZ Test : कराची कसोटीचा चौथा दिवसही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गाजवला. केन विल्यमसनने कसोटी करीयरमधील पाचवे द्विशतक (200*) पूर्ण केले, तर आणि इश सोढीने (65) अर्धशतक फटकावले. या जोरावर किवींनी यजमान पाकिस्तान समोर 9 गडी गमावून 612 धावांचा डोंगर रचला आणि अपला पहिला डाव घोषित केला. यासह पाहुण्या संघाने पहिल्या डावात 174 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर फलंदाजीस मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. चौथ्या दिवसाअखेर त्यांनी 2 बाद 77 धावा केल्या. ते अजूनही न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 97 धावांनी मागे आहेत.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने चौथ्या दिवशी 6 बाद 440 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. पण पाकिस्तानचा संघ पहिल्या दोन सत्रात केवळ 3 विकेट्स मिळवू शकला आणि न्यूझीलंडने 172 धावा जोडल्या. यादरम्यान, विवींचा माजी कर्णधार विल्यमसनने 395 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने नाबाद 200 धावा फटकावताना कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकावले. याशिवाय टॉम लॅथमने 113 धावा, डेव्हन कॉनवेने 92 धावा आणि ईश सोधीने 65 धावा केल्या. पाकिस्तानकडून अबरार अहमदने 205 धावांत 5 तर, नौमान अलीने 185 धावांत 3 बळी घेतले. मोहम्मद वसीम ज्युनियरला एक विकेट घेण्यात यश आले.

त्यानंतर पाकिस्तानच्या दुसऱ्या डावाला किवी गोलंदाजांनी सुरुंग लावला. एम ब्रेसवेलने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकची विकेट घेवून यजमान संघाला पहिला धक्का दिला. शफीकचा खराब फॉर्म दुसऱ्या डावातही कायम राहिला आणि तो 68 चेंडूंचा सामना करून 17 धावांवर बाद झाला. यावेळी पाकिस्तानची धावसंख्या 47 होती. त्यानंतर 29 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शान मसूदला (10) माघारी धाडण्यात आले. इश सोढीने त्याची विकेट घेतली. यावेळी पाकची धावसंख्या 71 होती. यादरम्यान, इमाम-उल-हकने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि एका टोकाने संयमी फलंदाजी केली. दिवसाअखेर तो 45 धावा करून नाबाद राहिला तर नौमान अली चार धावांवर खेळत आहे. (PAKvsNZ Test)

खेळाच्या शेवटच्या दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सत्रात होणार्‍या 30 षटकांमध्ये सौदी आणि कंपनी पाकिस्तानी फलंदाजांचा धुव्वा उडवण्याचा प्रयत्न करेल. यजमानांचे खेळाडू सकाळच्या आर्द्रतेत निसरड्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यास अपयशी ठरल्यास, त्यांच्या वाट्याला आणखी एक निराशा येईल.

अबरार अहमदचा 'पंच', पण नावावर लाजिवाण्या विक्रमाची नोंद

ऑफस्पिनर अबरार अहमदने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी तिसरी कसोटी खेळताना न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्याने एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची ही पाच डावांत दुसरी वेळ आहे. अबरारने एकूण 67.5 षटके टाकली ज्यात त्याने 205 धावा दिल्या. (PAKvsNZ Test)

दरम्यान, पदार्पणाच्या कसोटी डावातच सात विकेट घेणा-या या गोलंदाजाने आतापर्यंतच्या पाच डावात 22 विकेट्स घेण्याची किमया केली आहे. पण असे असूनही त्याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. अबरार हा कसोटीच्या एका डावात सर्वाधिक धावा देणारा पाकिस्तानचा सहावा गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानकडून एका डावात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम खान महमूदच्या नावावर आहे. त्याने हा विक्रम 1958 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला होता. या यादीत पाकिस्तानचा स्टार फिरकीपटू यासिर अलीचे नाव तीनदा आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT