Latest

पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र मंत्री येणार भारत दौर्‍यावर! SCO परिषदेत होणार सहभागी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानचे परराष्‍ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी पुढील महिन्‍यात भारत दौर्‍यावर येणार आहे. ४ आणि ५ मे रोजी गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO ) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते पाकिस्तानचे नेतृत्व करतील. SCO बैठकीत उपस्‍थित राहण्‍याबाबत बिलावल यांनी मौन बाळगले होते. मात्र, आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी आपण भारतात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

परराष्‍ट्र मंत्री जयशंकर यांच्‍याकडून निमंत्रण

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री गोव्‍यात ४ आणि ५ मे रोजी होणार्‍या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्‍यांना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आमंत्रित केले आहे.

तब्‍बल ९ वर्षानंतर पाकिस्‍तानमधील नेता देईल भारताला भेट

२०१४ मध्‍ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताला भेट दिली होती. त्‍यानंतर प्रथमच पाकिस्‍तानमधील नेता भारताला भेट देत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या युद्ध विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर हल्‍ला केला होता. त्‍यानंतर दोन्‍ही देशांमधील तणाव कमालीचे ताणले गेले होते.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. यंदा भारतात होणार्‍या या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील. SCO सदस्य देशांच्या काही मंत्र्यांसोबत ते द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT