इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर काही वेळातच चर्चा सुरु हाेणार आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली आहे. अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्यास संसद भंग केली जाईल, असा प्रस्ताव त्यांनी विरोधी पक्षांसमोर ठेवला आहे. दरम्यान, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी इम्रान खान यांचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. आता त्यांची मागील दाराने सुटका नाही, त्यांनी मानाने पंतप्रधानपदाची खुर्ची सोडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पाकिस्तानचे गृहंमत्री शेख रशीद यांनी म्हटलं आहे की, आमच्यासाठी पुढील ४८ तास खूपच महत्त्वाची आहेत. या ४८ तासांमध्ये देशातील राजकीय परिस्थिती नवीन वळण घेईल, तुम्हाला शनिवारी रात्रीपर्यंत वाट पाहावी लागेल. दरम्यान, पाकिस्तान नॅशनल ॲसेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी आज सायंकाळी संसदीय समितीची बैठक बोलवली आहे.
मित्र पक्षांनी साथा सोडल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आलेले आहे. अविश्वास प्रस्तावावर ३ किंवा ४ एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे.इम्रान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाला चौधरी आसिम नाजीर आणि मोहम्मद अस्लम भुटानी यांनी मंगळवारी सोडचिठ्ठी दिली. यानंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या (पीटीआय) सरकारला असलेला पाठिंबा मागे घेत असल्याचे मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) या पक्षाने बुधवारी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे जाहीर केले होते. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आल्याचे मानले जात आहे. इम्रान खान बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता देशाला उद्देशून भाषण करणार होते; मात्र ऐनवेळी ते रद्द करण्यात आले. पाक लष्कर व 'आयएसआय'प्रमुखांच्या दबावाखाली खान यांच्यावर आपले भाषण रद्द करण्याची वेळ ओढवल्याचे मानले जात आहे.
हेही वाचलं का?