पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवून पाकिस्तानने स्पर्धेत स्वतःचे आव्हान जिवंत ठेवले आहे. या पराभवानंतर बांगलादेश वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. वन-डे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला. बांगलादेशचे सात सामन्यांत केवळ दोन गुण आहेत. उर्वरित दोन सामने जिंकूनही त्याचे केवळ सहा गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानचे आता सात सामन्यांत सहा गुण झाले आहेत. त्यांनी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यास ते उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात. (PAK vs BAN)
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 45.1 षटकात 204 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने हे आव्हान 32.3 षटकात 3 विकेट गमावत 205 धावा करत पार केले. पाकिस्तानकडून फखर जमानने सर्वाधिक 81 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. अब्दुल्ला शफीकने 68 धावा केल्या. मोहम्मद रिझवान 26 आणि इफ्तिखार अहमद 17 धावांवर नाबाद राहिला. कर्णधार बाबर आझम नऊ धावा करून बाद झाला. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने तीन बळी घेतले. (PAK vs BAN)
तत्पूर्वी, फलंदाजी करताना पाकिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले.अखेरीस मोहम्मद वसीम ज्युनियरने 46 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुस्तफिजुर रहमानला क्लीन बोल्ड करत बांगलादेशच्या डाव 204 धावांवर रोखला.
बांगलादेशसाठी महमुदुल्लाहने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. तर लिटन दासने 45 धावांचे योगदान दिले कर्णधार शकीब अल हसन 43 आणि मेहदी हसन मिराज 25 धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर हरिस रौफला दोन विकेट घेतल्या. इफ्तिखार अहमद आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा :