Latest

उस्मानाबादला राष्ट्रपतीनंतर आता पंतप्रधान मिळाला ! दोन महाशय भलत्याच चर्चेत

backup backup

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मागील सहा वर्षात मुलीच्या जन्माचे स्वागत मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी विविध कार्यक्रमही आयोजिले जातात. तसेच वंशाचा दिवा म्हणून मुलाच्या जन्माचेही उत्साहात स्वागत केले जाते. याची चर्चाही मोठी होते. परंतु, मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयारच्या 'राष्ट्रपतीं' व पंतप्रधानाची चर्चा होत आहे. चिंचोलीचे राष्ट्रपती व पंतप्रधान असे म्हटल्यावर तुम्हीही दचकला असचाल. परंतु, हे खरे आहे.

ग्रामीण भागात बाळांच्या नामकरण (पाळणा) सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. पारंपरिक पद्धतीने महिला बाळाच्या कानात फुंकर मारून नाव ठेवतात. यामध्ये आत्याचा मान महत्त्वाचा असतो. यावेळी देव-देवतां पूर्वजांचे शिवाय जन्म दिवस आदी विविध कारणानुसार बाळाचे नाव ठेवण्याची प्रथा आहे. अलीकडच्या बदलत्या काळात मात्र राजकीय, चित्रपट व क्रिकेट क्षेत्रातील व्यक्तींचे नाव बाळाला देण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी पणजोबा, आजोबा, आजीचे नाव वाढवण्याची प्रथा आजही आहे. मात्र, उमरगा तालुक्यातील चिंचोली ( भुयार ) येथील खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या दता चौधरी या उच्चशिक्षित तरुणाने नामकरणाचा वेगळाच पायंडा पाडला. चौधरी यांना १९ जून २०२० ला पहिला मुलगा झाला, मुलगा झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. बाळाच्या नामकरण सोहळ्यात महिलांनी पहिल्यांदा देव-देवतांच्या नावाची फुंकर मारली. मात्र, चौधरी यांनी मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवण्याचा निर्णय घेतला. अन बाळाचे पाळण्यात नाव राष्ट्रपती ठेवले. त्यानुसार जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर महा नगरपालिकेतून 'राष्ट्रपती दत्ता चौधरी' नावाने जन्म प्रमाणपत्र तसेच आधारकार्डही काढले. त्यावेळी राष्टपती सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते.

त्यांच्या नंतर चौधरी यांना १० नोव्हेंबर २०२१ रोजी दुसरा मुलगा झाला. त्याने दुसऱ्या मुलाचे नामकरण पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला. दि २१ नोव्हेंबरला मुस्ती (जि. सोलापूर) येथे मुलाचे नाव 'पंतप्रधान' ठेवण्याचा विधी कार्यक्रम केल्यानंतर चौधरी यांनी बोरामणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे बाळाचा पंतप्रधान नावांचा जन्म दाखला देण्यासाठी अर्ज केला. मात्र, पंतप्रधानपद हे संविधानिक असल्याने जन्मदाखला देण्यात द्यावा की नाही याबाबत जन्म दाखल्याचा अर्ज लालफितीत अडकला.

पंतप्रधान नावाने मुलाचा जन्मदाखला देण्यासाठी प्रशासना कडून प्रतिसाद मिळत नसल्याने चौधरी यांनी शुक्रवारी (दि ११) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे ई-मेलद्वारे पत्र पाठवून कैफियत मांडली होती. चौधरी यांनी दुसऱ्या मुलाच्या पंतप्रधान नावाच्या जन्म दाखल्यासाठी गेली अडीच महिने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. प्रशासनाने वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले. अखेर सोलापूर च्या बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आय आर राठोड यांच्या स्वाक्षरीचा पंतप्रधान दत्ता चौधरी या नावाचा जन्म दाखला बुधवारी (दि १६) कविता दत्ता चौधरी यांना मिळाला आहे. त्यामुळे चिंचोलीचे हे राष्ट्रपती व पंतप्रधान सध्या भलतेच चर्चेत आले आहेत.

राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. या पदाबाबत मोठी आस्था असल्याने कुटुंबात राष्ट्रपती असावा अशी साधी संकल्पना होती. म्हणून पहिल्या मुलाचं नाव राष्ट्रपती ठेवले. त्याचा जन्म दाखला मिळवण्यासाठी कोणतीही अडवणूक झाली नाही. पण दुसऱ्या मुलाचं पंतप्रधान ठेवल्यानंतर हे संविधानिक पदनाम असल्याचं कारण देत, जन्म दाखला अडवून ठेवला होता. पण सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस 'पंतप्रधान 'चा जन्म दाखला मिळाला आहे
– दत्ता चौधरी, राष्ट्रपती व पंतप्रधानाचे वडील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT