जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता ईडीचा विषय संपला आहे. मी फक्त कोर्टाला घाबरतो; बाकी कुणालाही घाबरत नाही, असे सांगत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, तुम्ही छळता म्हणून मी पर्याय निवडला. माझ्याकडे अनेक पर्याय होते; परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माझा पक्ष माझ्या पाठीमागे भक्कम पणे उभा आहे, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, गिरीश भाऊ म्हणतात ना करा चौकशी. घाबरू नका. चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी खडसावले. कार्यकर्त्यांनी सीडी बद्दल विचारले असता पोलिस चौकशी करत आहेत. त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या. माझ्याकडे आली होती सीडी. थोडक्यात हुकली नाहीतरी तुम्हाला माहीत आहे ना कोणाची आहे सीडी? मग झाले ना. काही चिंता नाही. भक्कम रहा. एकत्र रहा. काही चिंता करू नका. आता ईडीचा ना आपला संबंध संपला. आता आपल्याला घाबरायचे कारण नाही. न्यायालयात दाखल झाली आणि त्याचा संबंध संपला. ईडीची नोटीस आली म्हणून गायब होतो म्हणे. मी दोन दिवसांपासून फरदापुरच्या विश्रामगृह येथे होतो, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही १० कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला. या मुलाखतीत त्यांनी ईडीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, मी तुमचा बीएचआर घोटाळा बाहेर काढला. त्यामुळेच यांचा जीव धकधक करत आहे. ईडीचा विषय आता संपला आहे. कोर्टात माझ्याविषयीची चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं खडसे यांनी स्पष्ट केले.