मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेचे बूक केलेले तिकीट रद्द करण्याच्या बहाण्याने सायबर ठगांनी एका कला-दिग्दर्शकाची ०२ लाख १९ हजार रुपयांना ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन व्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.
गिरगावातील जे. एस. एस. रोड परिसरात कुटुंबासोबत रहात असलेले ४८ वर्षीय तक्रारदार दिनेश हे कला-दिग्दर्शक असून फोर्ट येथील एका कंपनीमध्ये नोकरी करतात. ०२ डिसेंबर रोजी एका नातेवाईकाचे पुण्यात लग्न असल्याने त्यांनी भारतीय रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. या साईटवरून आपली आणि पत्नीची येण्या-जाण्याची तिकिटे ऑनलाईन बूक केली होती.
पत्नी आजारी पडल्याने दिनेश हे एकटेच लग्नासाठी पुणे येथे गेले होते. लग्नाच्या हॉलमध्ये असताना त्यांनी पत्नीच्या नावाने असलेले तिकीट रद्द करण्यासाठी गुगलवरील एक लिंक ओपन केली. त्यानंतर लगेचच त्यांना एका अनोळखी नंबरवरुन कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो रेल्वेचा एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याची बतावणी करुन दोन तिकीटापैकी कोणते तिकीट रद्द करायचे आहे, अशी विचारणा केली.
पत्नीचे तिकीट रद्द करायचे असल्याने दिनेश यांनी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन रद्द करायच्या असलेल्या तिकिटाचा पी. एन. आर. नंबर त्याला सांगितला. त्यावर त्या व्यक्तीने दिनेश याना एक अँप डाउनलोड करुन त्यात आवश्यक माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रोसिजर असल्याचे सांगत दोन सायबर ठगांनी दिनेश यांच्या खात्यावरून ०२ लाख १९ हजार ३६ रुपये ऑनलाईन लंपास केले.
आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने अखेर दिनेश यांनी मुंबईत येऊन आधी बँकेत धाव घेतली. झालेल्या व्यवहारांची माहिती घेऊन त्यांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात जात या ऑनलाईन सायबर फसवणुकिची तक्रार दिली आहे.
अधिक वाचा :