Latest

omicron corona : विमान कंपन्यांनी परदेशी प्रवाशांची माहिती द्यावी : उद्धव ठाकरे

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत ओमीक्रॉन विषाणूसंदर्भात ( omicron corona ) चिंता व्यक्त करण्यात आली. देशभरातील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानसेवा कंपन्यांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल. देश- विदेशातून येणार्‍या प्रवाशांची माहिती शासकीय यंत्रणेला नियमितरित्या मिळत राहिल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवून संसर्गालाही वेळीच रोखण्यात यश मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळात व्यक्त केला. दरम्यान, याबाबतची भूमिका आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेतच्या बैठकीत मांडू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाच्या ओमीक्रॉन ( omicron corona ) या नव्या विषाणूने जगभर कहर माजवण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात या नव्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासंदर्भात सोमवारी (ता. 29) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा ( omicron corona ) उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमीक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून, इथे भारतात उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच 7 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे, अशी माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली.

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT