पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला. या भीषण अपघात मृत्यूची संख्या २३८ वर पोहोचलीय. तर ९०० जण जखमी झाले आहेत. (Odisha train accident) दरम्यान, जखमींना रुग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रक्ताची आवश्यकता पाहून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग रुग्णालयात पोहोचला आहे. जखमींना रक्त देण्यासाठी बालासोरमधील रुग्णालयांमध्ये तरुणांनी रांगाच्या रांगा लागल्या आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने या माणुसकीचा फोटो शेअर केला आहे. (Odisha train accident)
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी बाहानगा बाजार स्टेशन येथे झाली. जेव्हा कोरोमंडल एक्सप्रेस कोलकाताच्या नजीक शालिमार स्टेशनहून चेन्नई सेंट्रल जात होती. दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर गतीने बचाव कार्य करत ३०० प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात आले. अद्यापही बचाव कार्य सुरु आहे.
कोरोमंडल एक्सप्रेसच्या एक प्रवाशाने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही शालीमार ते चेन्नई जात होतो. आम्ही एस 5 बोगीमध्ये होतो. ज्यावेळी अपघात झाला तेव्हा तो झोपला होता. आम्ही पाहिलं की, कुणाचे डोके नाही, कुणाचे पाय नाही तर कुणाचे हात नव्हते. सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आमच्या सीटच्या खाली २ वर्षाचे बाळ होते. आम्ही त्याला सुरक्षित बाहेर काडून त्याच्या परिवाराकडे दिले."