Latest

NZ vs SL : न्यूझीलंडचा एक पाय सेमीफायनलमध्ये, न्यूझीलंडची धारदार गोलंदाजी; बोल्टचे तीन बळी

Shambhuraj Pachindre

बंगळूर; वृत्तसंस्था : विश्वचषक 2023 ची उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात न्यूझीलंडला 5 विकेटस आणि 160 चेंडू राखून हरवले. या विजयामुळे किवींनी सेमीफायनलमध्ये आपला एक पाय टाकला असून त्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्ताच्या च्या मार्गात मोठा खड्डडा खणला आहे. (NZ vs SL)

अफगाणिस्तानचा शेवटचा सामना आज दक्षिण आफ्रिकेविरुध्द तर पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडविरुध्द उद्या (शनिवारी) होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असल्यास अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना आपल्या शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडच्या धारदार गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यांनी 46.4 षटकांत सर्वबाद 171 अशा धावा केल्या. हे आव्हान न्यूझीलंडने 23.2 षटकांत पूर्ण केले. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे (45), डॅरेल मिचेल (43) आणि रचिन रविंद्रने (42) धावा केल्या. 3 विकेट घेणारा ट्रेंट बोल्ट सामनावीर ठरला.  (NZ vs SL)

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. टीम साऊदीने दुसर्‍याच षटकात पथुम निसांका (2) याला बाद केले. त्यानंतर ट्रेंट बोल्टने एकाच षटकात कर्णधार कुसल मेंडिस (6) व सदिरा समरविक्रमा (1) यांना माघारी पाठवले; पण दुसर्‍याच षटकात जीवदान मिळालेल्या कुसल परेराने किवींची धुलाई केली. साऊदीने टाकलेल्या 6 व्या षटकात परेराने 18 धावा कुटल्या. आक्रमक फटकेबाजी करून त्याने 22 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कुसल परेराने या वर्ल्डकपमधील वेगवान अर्धशतक झळकावलेे. कुसल मेंडिसने 25 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.

बोल्टने दुसर्‍या बाजूने श्रीलंकेला धक्का देण्याचे सत्र सुरू ठेवले आणि चरिथ असलंकाला (8) पायचीत करून परेरासह त्याची 38 धावांची भागीदारी तोडली. लॉकी फर्ग्युसनने त्याच्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडला मोठी विकेट मिळवून दिली. त्याने 28 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा करणार्‍या परेराला माघारी पाठवले. श्रीलंकेचा निम्मा संघ 9.3 षटकांत 70 धावांवर माघारी परतला.

अनुभवी अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजया डी सिल्व्हा यांनी 34 धावा जोडून डावाला आकार दिला होता; पण मिचेल सँटेनरच्या फिरकीवर मॅथ्यूज (16) स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. पाठोपाठ सँटेनरने धनंजयालाही (19) माघारी पाठवून श्रीलंकेला सातवा धक्का दिला. फर्ग्युसनने दुसरी विकेट घेताना चमिरा करुणारत्नेला (6) बाद केले. त्यानंतर रचिन रवींद्रने एक विकेट घेतली. महिश तीक्षणा आणि दिलशान मदुशंका यांनी 10 व्या विकेटसाठी चिवट खेळी केली आणि 38 धावा जोडून वर्ल्डकपमधील श्रीलंकेकडून 10 व्या विकेटसाठी झालेली सर्वोत्तम भागीदारी केली.

दहाव्या विकेटचा विक्रम

तिक्षणाने वर्ल्डकपमध्ये 9 व्या किंवा खालच्या क्रमांकावरील फलंदाजाकडून सर्वाधिक 84+ चेंडू खेळण्याचा विक्रम केला. त्याने 2003 सालचा एंडी बिकल (वि. न्यूझीलंड) याचा विक्रम मोडला. या दोघांनी 87 चेंडूंत 43 धावा केल्या. मदुशंका 48 चेंडूंत 19 धावांवर बाद झाला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 46.4 षटकांत 171 धावांत माघारी परतला. तिक्षणा 91 चेंडूंत 38 धावांवर नाबाद राहिला.

रचिनने मोडला सचिनचा विक्रम

रचिनने पहिली धाव घेताच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. वयाच्या पंचवीशीच्या आत वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक धावांचा विक्रम रचिनने आज नावावर केला. सचिनने 1996 मध्ये 523 धावा करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती. बाबर आजम 2019मध्ये 474 धावा करून जवळ पोहोचला होता. 2007 मध्ये एबी डिव्हिलियर्सनेही 372 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप पदार्पणात सर्वाधिक धावांचा विक्रमही आज रचिनने नावावर केला. त्याने जॉनी बेअरस्टोचा 2019 सालचा 532 धावांचा विक्रम मोडला. (NZ vs SL)

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : 46.4 षटकांत सर्वबाद 171 धावा. कुसल परेरला (51), महेश तिक्ष्णा (38). ट्रेंट बोल्ट 3/37.

न्यूझीलंड : 23.2 षटकांत 5 बाद 172 धावा. (डेव्हॉन कॉनवे 45, डॅरेल मिचेल 43, रचिन रविंद्र 42. अँजेलो मॅथ्यूज 2/29)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT