पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणामधील नूह येथे ३१ जुलै रोजी धार्मिक यात्रेदरम्यान हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचार प्रकरणी बजरंग दलाचे नेते राज कुमार, ज्याला बिट्टू बजरंगी म्हणून ओळखले जाते, त्याला मंगळवारी (दि.१५) नूह पोलिसांनी अटक केली आहे. (Nuh Violence Bittu Bajrangi) दरम्यान, नूह जिल्हा न्यायालयाने बिट्टू बजरंगीला १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. बिट्टूसह अन्य १५-२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला काल नूह पोलिसांनी अटक केली होती.
नूहमध्ये ३१ जुलै रोजी हिंसाचार झाला, त्या दिवशी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये बिट्टू बजरंगीने म्हटले होते की, "हे सांगू नका की आधीच सांगितले नाही. आम्ही सासरवाडीला आलो. अन् आपली भेट झाली नाही. फुलं, पुष्पहार तयार ठेवा. 150 गाड्यांचा ताफा आहे."
नूह पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (दि.१५) सदर नूह पोलीस ठाण्यात एएसपी उषा कुंडू यांच्या तक्रारीवरून बिट्टू बजरंगी विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सरकारी सेवकाला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी कृती करणे, सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य करण्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने नुकसान करणे, दंगल आणि शस्त्रास्त्र कायद्याचे कलम 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याल आला आहे. पोलिसांनी सांगितले की, एफआयआरमध्ये बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याबद्दल विविध आयपीसी कलम आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत इतर 15-20 व्यक्तींची नावे नोंद आहेत.
फरिदाबाद पोलिसांचे प्रवक्ते सुबे सिंग यांनी सांगितले की, पोलिस त्याच्या साथीदारांची ओळख पटवण्यासाठी व्हिडिओद्वारे तपास करत आहेत. फरिदाबाद सायबर पोलीस या प्रकरणी सोशल मीडियावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. "कोणत्याही जाती/धर्म/समुदायातील कोणी सोशल मीडियावर भडकवणारी भाषणे किंवा मजकूर पोस्ट केल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,"
हेही वाचा