Latest

कार पुलिंगला ‘खो’

अमृता चौगुले

शशांक तांबे

पिंपरी : हिंजवडी परिसरातील वाहतुकीवर तोडगा निघावा यासाठी कार पुलिंगचा पर्याय आयटीयन्सने काढला होता; परंतु दोन आठवडे उलटूनही त्याविषयी प्रतिसाद न आल्याने आणि वर्क फ्रॉम होम मागणीवर ठाम असल्याने कार पुलींगचा विचार बारगळत आहे.

हिंजवडीमध्ये सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीला वैतागून कंपन्यांमधील कर्मचार्‍यांनी कार पुलिंगचा उपक्रम सुरु करण्याचे ठरवले होते. बहुतांश कंपन्या 10 जून पासून नियमित सुरु होत आहेत. त्या प्रमाणे कंपनीतील कर्मचार्‍यांनी एरिया प्रमाणे कार पुलिंगमध्ये सहभागी होणार्‍यांचे ग्रुप तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु योग्य असा प्रतिसाद मिळत नसल्याने कार पुलिंग बारगळत आहे. अनेक आयटीयन्स वर्क फ्रॉम होम बाबत इच्छूक आहेत तर कार पुलिंग केल्यास वाहतुकीची समस्या खरंच सुटेल का यावर विचार करत आहेत. त्यापेक्षा कंपनीची बस चांगली म्हणून बसला पसंती देत आहेत.

कार पुलिंग म्हणजे काय?

कंपनीतील ज्या कर्मचार्‍यांकडे चार चाकी वाहन आहे त्यांनी एक दिवस आपल्या वाहनात आपल्या सहकार्‍यांना घेऊन कामावर यायचे आणि त्यासाठी येणारा इंधनाचा खर्च विभागून घ्यायचा. त्यामुळे जवळपास राहणारे एकाच कंपनीतील कर्मचारी एकत्र येऊ शकतात. असे चार चाकी वाहन असणार्‍या कर्मचार्‍याने आळी पाळीने आपले वाहन घेऊन कामावर जायचे. एकावेळी चार जणं प्रवास करतात त्यामुळे हिंजवडी परिसरात गाड्यांचा वापर कमी होईल.

अल्प प्रतिसाद

आयटी कंपन्या दोन वर्षांनी पुन्हा सुरु होत आहेत. अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम बाबत आग्रही आहेत. कंपनीकडे त्या संबंधी मागणी सुरु आहे. अनेक कंपन्यांनी घरून काम व कार्यालयात येऊन काम असे पर्याय दिले आहेत. तसेच कंपनीच्या बसमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा असते. चारचाकी वाहनात एकाच वेळेस एकच मोबाईल चार्ज होणार. प्रत्येक कर्मचार्‍यांच्या शिफ्ट वेगळ्या, टीम वेगळ्या त्यामुळे घरी जाताना वेळांमध्ये तफावत राहणार आहे.

10 मे नंतर अनेक कंपन्यांमधील प्रतिनिधींनी कार पुलिंग बाबत सोशल मीडियावर मार्केटिंग सुरु केले होते; परंतु अल्प प्रतिसाद मिळत होता. सोशल मीडियावर शंका मोठ्या प्रमाणत येत आहेत. तर शिफ्ट आणि वेळांचे नियोजन कसे करणार याबाबत विचारणा होत आहे. त्यामुळे लवकर निघू पण, कंपनीच्या बसमधून जाऊ हे धोरण बर्‍यापैकी सोशल मीडियावर नोंदवले गेले आहे.

कंपन्यांकडून दुजोरा नाही

हिंजवडी आयटी नगरीमध्ये आयटीयन्स एकत्र येऊन अनेक उपक्रम करत असतात. तसेच कार पुलिंग हा उपक्रम राबवण्याचा विचार करण्यात आला होता. कंपनी प्रशासनाकडून मात्र या उपक्रमाला अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती. आयटीनगरी मधील 4 – 5 कंपनीमधील कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन आपापल्या कंपनीपुरता हा उपक्रम सुरु करण्याचे ठरवले होते; परंतु आपल्या सहकार्‍यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा उपक्रम बारगळत आहे.

मे महिन्यात कंपनीकडून ऑफिस काम सुरु करण्याचे 'ई- मेल'आल्यानंतर आम्हांला ही कल्पना सुचली होती. आम्ही सुरक्षेची खबरदारी घेतली होती. तसेच जास्तीत जास्त आयटीयन्स एकाच पट्ट्यात राहत असल्याने कार पुलिंगचा विचार केला होता, परंतु प्रतिसाद खूप कमी मिळाला आहे.
– रवींद्र चौबे, आयटीयन्स

या उपक्रमाबाबत अनेक शंका आहेत. वर्क फ्रॉम होमला जास्त प्रतिसाद आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये येवून काम करणार्‍यांची संख्या कमी आहे
– प्रकाश भोमे, आयटीयन्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT