पुढारी ऑनलाईन डेस्क : "लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना 'औरंग्यावरची' टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही." असं लिहित भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane Tweet) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा नितेश राणे असं का म्हणाले.
गेले काही दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यानिमित्ताने अजित पवार यांनी बुधवारी (दि.४) दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलताना म्हणाले, "मला विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीच्या आमदारांनी केले आहे. इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने मला विरोधी पक्षनेतेपद दिलेले नाही? माझ्याकडून राजीनामा मागण्यापेक्षा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना विचारा. राज्यपालांनी अपशब्द वापरले. महापुरुषांचा अपमान मंत्री महोदयांकडून झाला आहे. मी कधीच बेताल वक्तव्य केले नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या भाजप नेत्यांवर कारवाई कधी? असाही सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थिती केला.
यावेळी भाजपा नेते नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबतही अजित पवार यांना विचारलं तेव्हा त्यांनी," टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही असे म्हटले. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती?" असे म्हणत अजित पवार यांनी नितेश राणे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी केली. ते पुढे असेही म्हणाले की," त्यांच्या आरोपांना पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील, अशा लोकांच्या नादी आपण लागत नाही." अजित पवारांच्या या उत्तराला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टॅग करत म्हंटलं आहे की, "लघूशंकेने धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना 'औरंग्यावरची' टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही." या खोचक ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत की, अजित पवार यांची प्रतिक्रिया काय असेल.
हेही वाचा