Latest

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार अजितदादांसोबत, शपथविधीला होते हजर

गणेश सोनवणे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहाही आमदार अजितदादा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई येथे उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मोजके मोठे पदाधिकारीदेखील सोहळ्याला उपस्थित होते.  

रविवारी (दि. २) महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथविधी घेतला. यात नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्यासोबत देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, निफाडचे आमदार दिलीप बनकर, कळवण- सुरगाण्याचे आमदार नितीन पवार हे राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा संपूर्ण पक्ष सत्तेत सहभागी झाल्याचे दिसत होते. दरम्यान, या मोठ्या घडामोडीसंदर्भात आमदार सरोज अहिरे तसेच इतर आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसाठी हेलिकॉप्टर

शपथविधी सोहळ्याला नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहता यावे, यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातून काही मोजके राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेलिकॉप्टरने शपथविधी सोहळ्यासाठी रवाना होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने दिली.

अचानक मुंबईत येण्याचा निरोप : आव्हाड

आम्हाला मुंबईला येण्याचा अचानक निरोप मिळाला. मुंबईला कशासाठी बोलवले, हे आम्हाला माहीत नव्हते. मुंबईला आल्यानंतर आम्हाला आज अजितदादा पवार आणि छगन भुजबळ तसेच इतर आमदारांचा शपथविधी असल्याचे समजले, अशी प्रतिक्रिया शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT