पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन आज दिल्लीच्या लाल कटोरा स्टेडीयमवर पार पडले. या अधिवेशनात शरद पवारांची पुन्हा एकदा शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. (NCP President)
राष्ट्रवादीच्या दिल्लीतील कार्यसिमितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड करण्यात आली. दिल्लीत झालेल्या कार्यसिमितीच्या बैठकीत नव्या पक्षअध्यक्षाच्या निवडीबाबत ठराव मांडण्यात आला होता. या ठरवाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. (NCP President)
देशातील विविध समस्यांवर चर्चा घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीने दिल्लीत अधिवेशनाचे आयोजन केलेले आहे. कोरोना संकटकाळात राष्ट्रीय अधिवेशन घेता आले नाही, पण रविवारी हे अधिवेशन घेतले जाणार आहे. अधिवेशनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेससह सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे. अधिवेशनात सामील होणाऱ्यांना विविध समस्यांवर बोलण्याची संधी मिळेल, असे पवार यांनी सांगितले. कृषी कायद्याच्या अनुषंगाने पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन बसले. त्याना एक वर्ष आंदोलन करावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनीच याकडे दुर्लक्ष केले. केंद्र सरकारने संसदेत तीन कायदे मंजूर केले. हे कायदे शेतकऱ्यांविषयी होते, शेतीविषयी होते. हे तिन्ही कायदे राज्यसभा आणि लोकसभेत १० मिनिटांपेक्षा कमी कालावधीत मंजूर केले. यावर चर्चा करण्याच्या संसदीय अधिकारांचा स्वीकार करण्यात आला नाही. यामुळे हा संघर्ष उद्भवला. त्यानंतर सरकारवर तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची वेळ आली, असे पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या समस्या अनेक प्रकारच्या आहेत. देशात ज्यावेळी शेती मालाचे उत्पन्न वाढते, तेव्हा शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्याचा संधी मिळते. यावर्षी देशात तांदळाचे मोठे उत्पादन झाले आहे. अनेक देशांमध्ये तांदळाची कमतरता आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळण्याची शक्यता होती. पण सरकारने तांदूळ निर्यातीवर २० टक्के कर लादला. यानंतर आणखी एक पाऊल उचलले आणि तुकडा तांदूळ निर्यात करण्यावर निर्बंध लादले, असा आरोप पवार यांनी केला.