Latest

गुजरात, मुंबईतून १२० कोटींचे ड्रग्ज जप्त, एनसीबीची कारवाई, माजी पायलटसह एकूण ६ जणांना अटक

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि गुजरातमध्ये छापेमारी करुन तब्बल १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ६० किलो उच्च दर्जाचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एनसीबीने या ड्रग्ज कारवाईमध्ये एअर इंडियाच्या माजी पायलटसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.

गुजरातच्या जामनगर येथील नेव्हल इंटेलिजेंस युनिटने काही लोकांच्या संशयास्पद हालचालींबद्दल माहिती सामायिक केली होती. त्यानंतर, एनसीबीने या यंत्रणेच्या समन्वयाने तपास सुरू केला. विविध पैलूंचे बारकाईने निरीक्षण करत अतिरिक्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यात उच्च दर्जाच्या ड्रग्जची मोठ्या प्रमाणातील खेप गुजरातमधून इतर राज्यात नेली जाणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली.

एनसीबीने या कारवाईमध्ये १०.३५० किलो एमडी जप्त करत ३ ऑक्टोबरला आंतरराज्य ड्रग्ज तस्करीच्या सिंडिकेटचा भंडाफोड केला आणि चार प्रमुख साथीदारांना अटक केली. यात जामनगर येथून भास्कर व्ही. अटक करण्यात आली. तर अन्य आरोपींमध्ये माजी पायलट एस. जी. महिदा याच्यासह एस. एम. चौधरी आणि मुथू पी. डी. या तिघांना मुंबईतून अटक करण्यात आली.

आरोपींकडील चौकशी आणि प्रकरणाचा तपासात काही खुलासे होऊन या चौघांचे ड्रग्ज तस्करीमध्ये मोठे संबंध असून त्यांचे साथीदार मुंबईत कार्यरत असल्याची माहिती समोर आली. एनसीबीने पथकाने आणखी एक आरोपी एम. एफ. चिस्टी याला अटक करत ६ ऑक्टोबरला एसबी पथ, फोर्ट, मुंबई येथे असलेल्या एका गोडाऊनमधून सुमारे ५० किलो एमडी जप्त केले. पुढील तपासात एनसीबीने या टोळीचा मुख्य आरोपी एम. आय. अली याला अटक केली. दोन्ही आरोपी मुंबईचे असल्याची माहिती एनसीबीचे उपसंचालक एस. के. सिंग यांनी सांगितले.

सोहेल गफार हा एअर इंडियामध्ये होता पायलट

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या सोहेल गफार महिदा याने एअर इंडियामध्ये २०१६ ते २०१८ या काळात पायलट म्हणून सेवा बजावली होती. त्याने सॅन अँटोनियो, टेक्सास, यूएसए आणि लिथुनिया येथून उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर, मुथू नावाचा आरोपी हा ड्रग्ज तस्करीमधील हिस्ट्रीशीटर आहे. त्याला डीआरआयने २००१ मध्ये त्याला ३५० किलो वजनाच्या मँड्राक्स तस्करीच्या प्रकरणात अटक केली होती. २००८ पासून तो जामिनावर बाहेर वावरत होता.

जामनगर आणि मुंबईत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्त्रोत एकच आहे. जप्त केलेले ६० किलो एमडी हे फक्त एका खेपेचा एक भाग आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी उद्ध्वस्त केलेल्या एमडी ड्रग्ज रॅकेटशी त्याचा संबंध असल्याचेही समोर आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT