Latest

Navjot Singh Sidhu : यांना खुर्चीचा मोह सुटेना

अमृता चौगुले

पंजाब वार्तापत्र – पंकज कुमार मिश्रा, चंदीगड

काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर दबाव निर्माण करून कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात यशस्वी ठरलेले नवज्योतसिंग सिद्धू  ( Navjot Singh Sidhu ) यांची 'डाळ' अद्याप शिजलेली नाही, असे दिसून येत आहे. पक्षांतर्गतच विरोध झाल्याने मुख्यमंत्री पदाची खुर्ची येता-येता सिद्धूपासून दुरावली. परंतु, अजूनही पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सिद्धू यांचा मुख्यमंत्री पदाचा मोह काही सुटताना दिसून येत नाही. काँग्रेस श्रेष्ठींनी दलित चेहर्‍याच्या रूपात चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री बनवले असले, तरी राज्यात आपलेच राज चालेल, असा भ्रम सिद्धूंचा झाला होता. परंतु, काही दिवसांतच चन्नी यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची ताकद दाखवली. चन्नी आता 'कॉमन मॅन'चे प्रतीक ठरत आहेत. अशात सिद्धूंच्या दबावामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नसला, तरी पक्षाची प्रचार मोहीम साडेचार वर्षांत कॅप्टन यांनी केलेले कार्य विरुद्ध चन्नी यांचे सहा महिन्यांतील काम या भोवती एकवटली आहे. अशात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा सिद्धू पिछाडत असल्याचे दिसून येत आहे.

'व्हॉट अ टायमिंग सरजी..!'( Navjot Singh Sidhu )

विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये ( panjab election )अंमलबजावणी संचालनालयाचे धाडसत्र राजकीय वर्तुळात बराच चर्वितचर्वणाचा विषय ठरत आहे. ज्या राज्यात भाजप कमकुवत असते, अशा राज्यांत विरोधी पक्षांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जातो. परंतु, ऐन निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या या धाडसत्रांमुळे राजकीय वर्तुळात 'व्हॉट अ टायमिंग सरजी'ची चर्चा आहे. मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांच्या निकटवर्तीयांच्या घरी 'ईडी'ने 11-12 जानेवारी रोजी छापा टाकला होता. अवैध उत्खननासंबंधी करण्यात आलेल्या या कारवाईत कोट्यवधीची रोकड यंत्रणेच्या हाती लागली आहे. छाप्याने मात्र कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण बरेच तापवले आहे. मुख्यमंत्र्यांना त्यामुळे विरोधी पक्ष आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, भाजप, तसेच काँग्रेस पक्षश्रेष्ठी अशा दोन आघाड्यांवर उत्तर द्यावे लागत आहे. काँग्रेस श्रेष्ठी मात्र मुख्यमंत्र्यांच्या सोबत उभे आहेत. राष्ट्रीय महासचिव रणदीप सिंह सूरजेवाला यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे यासंबंधी तक्रार केली आहे. परंतु, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu ) या कारवाईसंबंधी मौन बाळगून असल्याचे दिसून आले. हादेखील विषय राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. सिद्धू अद्यापही प्रसारमाध्यमांसमोर धाडसत्रासंबंधी चन्नी यांचा बचाव करताना दिसून आलेले नाहीत.

'आपचा मान' भगवंत मान…

चुकांमधून शहानपण घेत आम आदमी पक्षाने यंदा पंजाब विधानसभा निवडणुकीत ( panjab election ) मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आहे.जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाणून घेण्यासाठी पक्षाकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्यानंतर पंजाबच्या 21 लाखांहून अधिक लोकांनी मेसेज आणि फोन कॉलवरून भगवंत मानच्या बाजूने कौल दिला. सुमारे 97.3 टक्के लोकांनी भगवंत मान यांच्या बाजूने मत नोंदवल्याचा दावा आपचे सुप्रिमो, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. आता 'आपचा मान भगवंत मान' असे समीकरण बनत असल्याचे दिसून येत आहे. खासदार मान हे संगरूर जिल्ह्यातील धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अशात पक्षाची प्रतिष्ठा सांभाळत विरोधकांचा सामना करण्याची मोठी जबाबदारी मान यांच्या खांद्यावर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT