लालू प्रसाद यादव यांचे आणीबाणीवर वक्तव्य  file photo
राष्ट्रीय

इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले, पण कधी...; हे काय बोलून गेले लालू प्रसाद?

लालू प्रसाद यादव यांची सोशल मीडियावर पोस्ट; भाजप संतप्त

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने आणीबाणीच्या मुद्द्यावरून सर्वप्रथम काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून संसदेतही गदारोळ झाला. आता आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या आणीबाणीवरील वक्तव्याने भाजप संतप्त झाली आहे. लोकशाहीच्या इतिहासात आणीबाणी हा काळा डाग आहे, पण त्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना कधीही शिवीगाळ केली नाही. त्यांच्यासह अनेक नेत्यांना तुरूंगात टाकले पण इंदिरा गांधी आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्यांना कधीही देशद्रोही म्हटले नाही किंवा त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नही उपस्थित केले नाहीत, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

लालू प्रसाद यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका

लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियावर 'द संघ सायलेन्स ऑन १९७५' या त्यांच्या एका लेखाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, जयप्रकाश नारायण यांच्या सुकाणू समितीचे ते निमंत्रक होते. आणीबाणीविरुद्धचे आंदोलन पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मिसा अंतर्गत त्यांना १५ महिने तुरुंगात राहावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे काही नेते सध्या आणीबाणीवर बोलतात. मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी आणीबाणीच्या काळात या नेत्यांची नावं ऐकली नाहीत. आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरचा डाग आहे, परंतु ज्यांना लोकशाही आणि विरोधी पक्षांबद्दल जराही आदर नाही असे लोक आणीबाणीवर भाष्य करू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

इंदिरा गांधींनी कधीही शिवीगाळ केली नाही

इंदिरा गांधींनी आम्हाला तुरुंगात टाकले, पण कधीही शिवीगाळ केली नाही. त्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्यांना कधीही देशद्रोही म्हटले नाही. संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांनी कधीही अपमान केला नाही. १९७५ हा लोकशाहीवरील काळा डाग नक्कीच आहे, पण २०२४ मध्ये विरोधकांचा आदर न करणाऱ्यांना विसरता येणार नाही, अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.

त्यांची राजकीय कारकीर्द संपली आहे : निखिल आनंद

लालू यादव यांच्या या वक्तव्याबाबत भाजप नेते निखिल आनंद म्हणाले, दिवंगत जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांनाही लालू प्रसाद यादव यांच्या आणीबाणीबाबतच्या नव्या विश्लेषणामुळे खूप वाईट वाटले असेल. लालूप्रसाद यादव यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपली आहे. आता त्यांना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता आहे. ते इतक्या खालच्या पातळीवर कसे गेले? २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. ही आणीबाणी २१ महिने चालली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT