Zomato Blinkit Instamart adult product Controversy
नवी दिल्ली : स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट या अॅपमुळे किराणा मालापासून ते शालेयपयोगी साहित्य, लहान मुलांची खेळणी अवघ्या काही मिनिटांमध्ये घरपोच मिळतात. पण याच अॅपवर आता कंडोम, सेक्स टॉयपासून वयस्क श्रेणीत मोडणारी उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध असून या गंभीर प्रकाराकडे एका सजग महिलेले लिंक्डइनवरील पोस्टमधून लक्ष वेधले आहे. ही पोस्ट व्हायरल होताच झोमॅटोचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपींदर गोयल यांनी कमेंट केली आहे. 'मी स्वत: देखील वडील असल्याने मला याचे गांभीर्य माहिती आहे. आम्ही लवकरच यावर तोडगा काढू', असं आश्वासन गोयल यांनी दिलंय.
थायलंडमधील बँकॉक येथे राहणाऱ्या पौन्सेंना डॅव्हिड (Ponsana DAVID) या थाई ग्रीन पॉवर सॉल्यूशन या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी 'लिंक्डइन' वर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्या म्हणतात, ‘मला 14 आणि 9 वर्षांची मुलगी आहे. मी नोकरी करणारी आई असून मी कामानिमित्त घराबाहेर असताना माझ्या मुलांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांना डिजिटल व्यवहार शिकवले आहेत. ते शालेयपयोगी, मूलभूत गरजेच्या वस्तूंपासून खाद्यपदार्थापर्यंत ऑनलाइन ऑर्डर करतात. यासाठी ते झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट अशा अॅप्सचा वापर करतात. पण हल्ली मी बघतेय की याच अॅपवर आता कंडोम, सेक्स टॉय अशी वयस्क व्यक्तींसाठीची उत्पादनंही विक्रीस उपलब्ध आहेत. अशी उत्पादन लहान मुलांना दिसू नये यासाठी पालकांचं कोणतंही नियंत्रण नाही.’
डेव्हिड यांनी उपस्थित केलेले प्रश्नही तितकेच गंभीर आहेत. ‘माझी मुलं प्रौढांसाठीची उत्पादनं शोधणार नाही. पण जिथून शालेयपयोगी वस्तू मागवतोय त्याच्या बाजूला असली उत्पादनं दिसत असतील तर कदाचित खेळणं वाटून ते ऑर्डरही करतील. कल्पना करा तुम्ही घरी आलाय आणि तुमचा नऊ वर्षांचं मूल हातात सेक्स टॉय घेऊन उभे आहे. हे लाजिरवारणं आहे किंवा अशी उत्पादनं ऑनलाइन विकूच नये हा मुद्दा नाही. इथे मुद्दा आहे टेक कंपन्यांनी जबाबदारीने वागून तशी काळजी घेण्याची आहे’, असं डेव्हिड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
डेव्हिड यांच्या पोस्टवर अनेक पालकांनी कमेंटमध्ये चिंता व्यक्त केली. झोमॅटोचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपींदर गोयल यांनी डेव्हिड यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. 'मी स्वत: वडील आहे. मला तुम्ही सांगितलेल्या प्रकाराचे गांभीर्य माहितीये. आम्ही यावर तोडगा काढू', असं आश्वासन त्यांनी दिले.