Jai Jagat conference Agra
नवी दिल्ली : युवक बिरादरीद्वारे आग्रा येथे ३ दिवसीय 'जय जगत परिषद' पार पडली. देशभरातून कायदा, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, कला, वैद्यकीय शिक्षण अशा विविध क्षेत्रातील २५० युवक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. यात काहींनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता. यामध्ये मानवी मूल्यांचे अंगीकार, वसुंधरा रक्षण, आत्मनिर्भर समाजासाठी नव्या मार्गांचा स्वीकार, भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे, आत्मनिर्भर ग्रामीण भारत, केंद्र-राज्य संबंधांचा पुनर्विचार, जागतिक शांतता आदी विषयांवर प्रतिनिधींचे संशोधन पेपर प्रेझेंटेशन, मान्यवरांचे सत्र आणि अनेक गोष्टी होत्या. सहभागी प्रतिनिधींनी ताजमहाल, आग्रा किल्ला या ठिकाणीही भेट दिली.
याच परिषदेत युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांच्या 'माझी बिरादरी' पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव, खासदार शशांक मनी त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर, बिरादरीच्या विश्वस्त स्वर क्रांती, इतिहास अभ्यासक अरुण डंग यावेळी उपस्थित होते. दरम्यान, युवक बिरादरीचे अध्यक्ष अभिषेक बच्चन यांनीही कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होत शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना माजी न्यायमूर्ती साधना जाधव म्हणाल्या की, एवढी वर्षे युवकांना दिशा देणारी अग्रगण्य संस्था म्हणून युवक बिरादरी कार्यरत आहे. युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, राजकीय समज, भारतीय सांस्कृतिक मूल्य रुजवण्यासाठी युवक बिरादरीने केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे एखादी गोष्ट सुरू करणे आणि ५० वर्ष देशभर हा प्रवास करणे हे कौतुकास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या. तर कुमार केतकर यांनी 'जय जगत' या विनोबा भावे यांनी दिलेल्या घोषणेबद्दलचा इतिहास सांगितला. आपल्या देशात 'जय जगत'चा नारा १९४९ मध्ये सर्वप्रथम विनोबा भावे यांनी दिला. ती वेळ अनेक अर्थांनी महत्वाची होती. त्यानंतर देशात भूदान चळवळ सुरू झाली. जगाच्या कल्याणाचा विचार 'जय जगत' या घोषणेच्या माध्यमातून त्यावेळी मांडला गेला, असेही कुमार केतकर म्हणाले.
युवक बिरादरीच्या 'जय जगत परिषदे'त मुंबई उत्तराखंड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राजेश टंडन यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोबतच विविध सत्रांसाठी करिअर मेंटॉर आशुतोष शिर्के, नांबियार समूहाचे आयुष नांबियार, मुंबई विद्यापीठातील प्रा. डॉ. मृदुल निळे, प्रा. डॉ. हुबनाथ पांडे, दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अपूर्वानंद, ज्येष्ठ बिरादर नागेंद्र राय, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ सुजित कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी झाले होते.
प्रसिध्द कथक नृत्यांगणा गौरी त्रिपाठी, कथक नृत्यांगणा तारीणी त्रिपाठी, गायक अतुल सुंदरकर, अक्षय जाधव आणि एक सूर एक ताल टीम यांच्या 'मिले सूर मेरा तुम्हारा' या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.