

नवी दिल्ली: "स्वातंत्र्याच्या महिन्यात दिल्ली विकास क्रांतीची साक्षीदार होत आहे," असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ११,००० कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. द्वारका एक्सप्रेसवे आणि अर्बन एक्स्टेंशन रोड-२ या प्रकल्पांमुळे दिल्ली हे विकसित होत असलेल्या भारताचे मॉडेल बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, या प्रकल्पांमुळे दिल्ली, गुरुग्राम आणि संपूर्ण एनसीआरमधील नागरिकांचा प्रवास सुकर होईल, वेळ वाचेल आणि उद्योग-व्यापाराला चालना मिळेल. ते म्हणाले, "जेव्हा जग भारताकडे पाहते, तेव्हा ते प्रथम दिल्लीकडे पाहते. त्यामुळे दिल्लीला विकासाचे मॉडेल बनवणे आवश्यक आहे." गेल्या दशकात दिल्ली-एनसीआरमधील कनेक्टिव्हिटीमध्ये अभूतपूर्व सुधारणा झाली असून, मेट्रोचे जाळे आणि नमो भारत रॅपिड रेलसारख्या आधुनिक सुविधांमुळे दिल्ली जागतिक नकाशावर येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पांच्या माध्यमातून शाश्वत विकासावरही भर देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अर्बन एक्स्टेंशन रोडच्या बांधकामात लाखो टन कचऱ्याचा वापर करण्यात आला असून, यामुळे दिल्लीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपासून मुक्त करण्यास मदत होत आहे. तसेच, यमुना स्वच्छता आणि इलेक्ट्रिक बससेवेसारख्या उपक्रमांबद्दल त्यांनी दिल्ली सरकारच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी द्वारका एक्सप्रेसवेला 'अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना' म्हटले. हा प्रकल्प केवळ एक महामार्ग नसून, तो यशोभूमी, बिजवासन रेल्वे स्टेशन आणि दिल्ली मेट्रोला जोडणारा एक मल्टी-कनेक्टिव्हिटी हब आहे. या कामादरम्यान १०,००० हून अधिक झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.