अपहरण आणि खून प्रकरणी फरार असणारा सलीम वस्तिकला त्याची उर्वरित जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी तिहार तुरुंगात धाडण्यात आले आहे. 
राष्ट्रीय

YouTuber Salim Vastik arrested | २६ वर्षांपासून फरार 'खुनी' निघाला प्रसिद्ध युट्युबर; बॉलिवूड बायोपिकचीही सुरू होती तयारी!

YouTuber Salim Vastik arrested | अपहरण-हत्या प्रकरणी झाली होती जन्मठेपेची शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

YouTuber Salim Vastik arrested

नवी दिल्ली : इस्लामवर टीका करणारा युट्युबर आणि सामाजिक कार्यकर्ता, अशी ओळख असणारा सलीम वस्तिक याला तीन दशकांपूर्वीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अपहरण-हत्या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र पॅरोलवर सुटका झाल्‍यानंतर तो फरार झाला होता. स्वतःची ओळख बदलून त्‍याने तब्‍बल २६ वर्ष व्‍यतित केली. मागील काही वर्षांत युट्युबच्या माध्यमांतून प्रसिद्धीही मिळवली. विशेष म्हणजे त्याच्या आयुष्यावर आधारित बॉलिवूड बायोपिकसाठी देखील त्याचा करार झाला होता. आता तोच सलीम वास्‍तिक हा तो गेल्या २६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सलीम खान असल्याचे उघड झाले आहे.

१९९५ मध्‍ये व्‍यावसायिकाच्‍या मुलाचे अपहरण

२० जानेवारी १९९५ रोजी दर्यागंज येथील रामजस स्कूलमधील १३ वर्षीय संदीप बन्सलचे अपहरण झाले होते. तो ईशान्य दिल्लीतील सिमेंट व्यावसायिक सीताराम बन्सल यांचा मुलगा होता. अपहरणानंतर दुसऱ्याच दिवशी सीताराम यांना ३०,००० रुपयांच्या खंडणीसाठी फोन आला. बागपतला जाणाऱ्या बसमध्ये पैसे ठेवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. बन्सल यांनी पैसे पाठवलेही; पण संदीप घरी परतला नाही.

खुनाचे गूढ उकलले, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पोलिसांचा संशय संदीपच्या शाळेतील मार्शल आर्ट्स प्रशिक्षक सलीम खान याच्यावर होता. शेजाऱ्याने संदीपला सलीम खानबरोबर रिक्षातून जाताना पाहिले होते. चौकशीदरम्यान, सलीम खानने संदीपचा खून केल्याची कबुली दिली. त्याने साथीदार अनिलच्या मदतीने संदीपचे अपहरण केले होते. अपहरण आणि हत्या प्रकरणी सलीम खान आणि अनिल या दोघांना १९९७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

मृत घोषित करून, ओळख बदलून २६ वर्षे फरार

सन २००० मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने सलीम खानला अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर तो तुरुंगात गेलाच नाही. स्वतःला मृत घोषित करून त्याने 'सलीम अहमद' आणि नंतर 'सलीम वस्तिक' अशी नवीन ओळख धारण केली होती. पुढील २५ वर्षे तो हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील विविध भागात कपाट बनवणारा कारागीर म्हणून काम करत राहिला.

'सामाजिक कार्यकर्ता' आणि युट्युबर म्हणून प्रसिद्ध

काही वर्षांनंतर सलीम याने गाझियाबादमधील लोणी येथे महिलांच्या कपड्यांचे दुकान उघडले. याच काळात तो 'सामाजिक कार्यकर्ता' आणि युट्युबर म्हणून प्रसिद्ध झाला. धार्मिक विषयांवरील त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली.

प्रसिद्धीच ठरली घातकी

डिसेंबर २०२५ आणि २०२६ च्या सुरुवातीस वाढलेल्या प्रसिद्धीमुळेच तो पोलिसांच्या रडारवर आला. डीसीपी (गुन्हे) संजीव यादव यांनी सांगितले की, पॅरोलवरून पळालेल्या गुन्हेगारांचा शोध घेताना इन्स्पेक्टर रॉबिन त्यागी यांच्या पथकाने गुप्त माहिती आणि जुन्या फिंगरप्रिंट्सच्या आधारे तपास केला. त्यातून हे सिद्ध झाले की, प्रसिद्ध 'एक्स-मुस्लिम सलीम वस्तिक' हा फरार आरोपी सलीम खानच आहे."

प्राणघातक हल्ला आणि अटक

अटकेपूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये लोणी येथील त्याच्या कार्यालयात वस्तिकवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याच्या पोटावर आणि मानेवर १० पेक्षा जास्त वार करण्यात आले होते. त्याच्या धार्मिक भाषणांमुळे हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवली होती. आता जखमांमधून सावरल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोणी येथून त्याला ताब्यात घेतले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सलीम वस्तिकला त्याची उर्वरित जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी तिहार तुरुंगात धाडण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT