युवक काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील मेटाच्‍या कार्यालयात तोडफोड केली Photo x
राष्ट्रीय

Social Media Ban Row : हैदराबादमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून 'मेटा'च्या कार्यालयाची तोडफोड

कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी, भाजपकडून तोडफोडीचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

Youth Congress Meta office vandalism Hyderabad : पक्ष नेत्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर घातलेल्या निर्बंधांविरोधात युवक काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील मेटाच्‍या कार्यालयात तोडफोड केली. तसेच सात दिवसांचा निर्बंध घातलेली अकांउट पूर्ववत करा, अन्‍यथा देशभर आंदोलन केले जाईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे. दरम्‍यान, या हिंसाचाराचा भाजपने निषेध केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी निदर्शनांवर टीका करत, काँग्रेसला "गुंडांचा पक्ष" असे संबोधले आहे.

कार्यालयातील साहित्याची तोडफोड, ठिय्‍या आंदोलनाचा प्रयत्‍न

हैदराबादमधील रायदुर्गम येथील 'स्काय व्ह्यू' संकुलात मेटाचे कार्यालय आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हातात फलक घेऊन आलेल्या सुमारे २५ कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसरात प्रवेश केला. कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कॉरिडॉरमधील कुंड्या आणि इतर साहित्याची तोडफोड केली आणि तिथेच ठिय्या मांडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेड्डी यांच्यासह २० कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेतले. आवश्यक जामिनाची पूर्तता केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

मेटाने निर्बध आणल्‍याचा आरोप

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा यांच्या सोशल मीडिया खात्यांवर मेटाने निर्बंध आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दबावाखाली मेटा काम करत असून पक्षाच्या अनेक पोस्टही हटवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्‍यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये कार्यकर्ते फलक घेऊन कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी करताना आणि एक कार्यकर्ता कुंडी फोडताना स्पष्ट दिसत आहे. आंदोलकांनी मेटाच्या मुख्य कार्यालयात प्रवेश केला नसल्याचे तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

... अन्‍यथा देशभरात मेटाच्‍या कार्यालयाबाहेर आंदोलन

या आंदोलनानंतर विरोधी पक्षांचे नेते, इन्फ्लुएन्सर्स आणि पत्रकारांची बंद केलेली खाती सात दिवसांत सुरू करण्याचा अल्टिमेटम युवक काँग्रेसने मेटाला दिला आहे. मागणी मान्य न झाल्यास देशभरातील मेटाच्या कार्यालयांना लक्ष्य केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या आंदोलनानंतर अवघ्या १५ मिनिटांत राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रभारींची इन्स्टाग्राम खाती पूर्ववत करण्यात आल्याचा दावा युवक काँग्रेसने केला असून मुंबई आणि गुरुग्राम येथील मेटा कार्यालयांबाहेरही अशीच निदर्शने करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

काँग्रेसकडून तोडफोडीच्‍या राजकारणाला प्रोत्‍साहन : भाजप

या घटनेनंतर भाजपने काँग्रेसला लक्ष्‍य केले आहे.काँग्रेसकडून तोडफोडीच्या राजकारणाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसचा उल्लेख 'गुंडांचा पक्ष' असा केला. भंडारी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, "काँग्रेस हा गुंडांचा पक्ष आहे! युवक काँग्रेसच्या गुंडांनी केवळ हैदराबादमधील मेटाच्या कार्यालयाची तोडफोडच केली नाही, तर सोशल मीडियावर त्याचे प्रदर्शनही मांडले आहे." यापूर्वी 'वर्ल्ड एआय समिट'मध्ये घुसखोरी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशाचा अपमान केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT