Rahul Gandhi Election Commission Pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi: ‘तुम्हाला सोडणार नाही’, राहुल गांधींची निवडणूक आयोगावर सडकून टीका; म्हणाले, ‘भाजप, RSS आणि ECने देशद्रोह केला’

Rahul Gandhi Election Commission: राहुल गांधी यांच्या ‘मतदान चोरी’च्या आरोपांना निवडणूक आयोगाने यापूर्वी चुकीचे आणि निराधार असल्याचे सांगत फेटाळले होते.

Rahul Shelke

Rahul Gandhi Election Commission: निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. मतदान प्रक्रियेत अनियमितता आणि मतदार यादीतील बदलांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भाजप, RSS आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत ‘वोट चोरी’ हा भारतीय जनतेविरोधातील अपराध असून, तो संविधानावर थेट हल्ला असल्याचा दावा केला. तसेच भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाने मिळून हे केल्याचा आरोप करत त्यांनी याला ‘देशद्रोह’ म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले, “मतदान चोरी हा भारतीय जनतेविरोधातील अपराध आहे आणि आपल्या संविधानावर थेट हल्ला आहे. भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाने हे घडवून आणले असून, त्यांनी देशद्रोह केला आहे. न्याय होईल.”

या पोस्टसोबत राहुल गांधी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांना इशारा देताना, “तुम्ही जे करत आहात ते चुकीचे आहे. हा देशद्रोह आहे. वेळ येईल, आम्ही तुम्हाला पकडू. तुम्ही वाचणार नाही,” असे म्हटले आहे.

काँग्रेसकडूनही निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

या प्रकरणावर काँग्रेसनेही निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून लोकशाही कमकुवत करण्याचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

काँग्रेसने निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. आयोगातील अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या 10 महिन्यांत तब्बल 14 वेळा तक्रारी केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांना काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली जात नव्हती. तसेच काही निर्णय घेताना त्यांच्याशी सल्लामसलत केली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या तक्रारींमध्ये SIR, फॉर्म 6 मधील बदल, नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतून नावे वगळणे किंवा समाविष्ट करणे, मतदारांची नावे पुन्हा अॅड करण्याच्या आदेशांविरोधातील अपील आणि मतदार यादीच्या सुरक्षेसह आयोगाच्या कामकाजाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.

‘ज्ञानेश कुमारच सर्व निर्णय घेत आहेत’, काँग्रेसचा आरोप

काँग्रेसने आरोप केला की, तीन सदस्यांच्या निवडणूक आयोगात सध्या केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच निर्णय घेत आहेत. ज्ञानेश कुमार हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी राहुल गांधी यांनी केलेले मतदानातील अनियमिततेचे आरोप फेटाळून लावले आहेत.

राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आक्षेप

राहुल गांधी गेल्या काही काळापासून निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि मतदार यादीशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आयोगाने मात्र राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालात तीनपैकी दोन निवडणूक आयुक्तांनी काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत माहिती न दिल्याबद्दल आणि मतदार यादीशी संबंधित प्रक्रियेबाबत आक्षेप घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसने निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT