Women’s Day file photo
राष्ट्रीय

Women’s Day: 'ती' ठीक आहे का? विवाहित महिलांमध्ये नैराश्य आणि चिंता का वाढते? कारणे, लक्षणे आणि उपाय

लग्नानंतर महिलांना मानसिक त्रास का होतो? संसाराच्या ओझ्याखाली तुमचं मानसिक आरोग्य तर दबत नाही ना? महिलांनी स्वतःला जागरूक ठेवण्यासाठी खालील प्रमुख समस्या आणि उपाय समजून घेणे गरजेचे आहे.

मोहन कारंडे

Women’s Day Special:

नवी दिल्ली: अनेकवेळा विवाहित महिलांना आपल्या मानसिक अस्वस्थतेचे मूळ कारण आपले वैवाहिक आयुष्य असू शकते, याची जाणीव नसते. बदलती जीवनशैली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांमध्ये नैराश्य, चिंता आणि झोप न लागणे यांसारख्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. वेळीच उपचार न मिळाल्यास या समस्या गंभीर होऊ शकतात, असा इशारा मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, महिलांना आपल्या मानसिक आरोग्याबाबत माहिती नसणे आणि लक्षणे समजल्यानंतरही उपचारांना उशीर करणे, यामुळे परिस्थिती अधिक आव्हानात्मक होते. महिलांनी स्वतःला जागरूक ठेवण्यासाठी खालील प्रमुख समस्या आणि त्यावरील उपाय समजून घेणे गरजेचे आहे.

१. नैराश्य

कारणे: भावनिक दुर्लक्ष, जोडीदाराशी वाद, वंध्यत्वाच्या समस्या, बाळंतपणानंतरचे बदल, आर्थिक चणचण आणि कुटुंबाकडून मिळणारा अपुरा पाठिंबा.

लक्षणे: सतत उदास वाटणे, कशातही मन न लागणे, झोप न येणे, थकवा आणि जगण्याची उमेद हरवणे.

उपाय: पतीशी मोकळेपणाने बोला, मित्र-मैत्रिणींशी संवाद ठेवा आणि स्वतःला प्राधान्य द्या. जर ही लक्षणे सलग दोन आठवडे जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२. एंग्जायटी (चिंता)

कारणे: अपेक्षांचे ओझे, आर्थिक असुरक्षितता, पालकत्वाचा ताण आणि सासरच्या मंडळींशी असलेले मतभेद.

लक्षणे: सतत अनामिक भीती वाटणे, विनाकारण घाम येणे, अस्वस्थता आणि चिडचिड होणे.

उपाय: स्वतःसाठी मर्यादा निश्चित करा, मनःशांतीसाठी ध्यानधारणा करा आणि शिस्तबद्ध दिनचर्या पाळा.

३. पोस्टपार्टम डिप्रेशन (प्रसूतीनंतरचे नैराश्य)

कारणे: हार्मोनल बदल, अपुरी झोप आणि भावनिक आधाराची कमतरता.

लक्षणे: वारंवार रडू येणे, स्वतःला दोषी मानणे, बाळाशी जवळीक न वाटणे आणि थकवा.

उपाय: कुटुंबाचा खंबीर पाठिंबा, पुरेशी विश्रांती आणि मुलाच्या संगोपनात पतीची सक्रिय मदत.

४. ॲडजस्टमेंट डिसऑर्डर

कारणे: लग्नानंतर अचानक बदललेले राहणीमान, संयुक्त कुटुंबात राहताना येणाऱ्या अडचणी किंवा करिअर सुटणे.

लक्षणे: मूड स्विंग्स, लोकांमध्ये मिसळणे टाळणे आणि सतत चिडचिड करणे.

उपाय: नवीन वातावरणाशी हळूहळू जुळवून घेण्याचा प्रयत्न करा आणि जोडीदाराशी संवाद साधा.

५. घरगुती हिंसाचार

कारणे: शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक छळ.

लक्षणे: छळाच्या घटना पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येणे, कोणावरही विश्वास न बसणे आणि सतत असुरक्षित वाटणे. अशा स्थितीत महिलांची सुरक्षा ही प्राथमिकता असते. तातडीने व्यावसायिक आणि कायदेशीर मदत घेणे अनिवार्य आहे.

६. स्लीप डिसऑर्डर

कारणे: घर आणि ऑफिस अशा दोन्ही जबाबदाऱ्यांचे ओझे, विश्रांतीचा अभाव आणि स्वतःसाठी वेळ न मिळणे.

लक्षणे: डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव आणि सतत थकवा जाणवणे.

उपाय: कामाची विभागणी करा, मदतीसाठी विचारताना संकोच करू नका आणि पुरेशी झोप घ्या.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ञ सांगतात की, महिलांनी शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्याला महत्त्व देणे गरजेचे आहे. समस्या अंगावर काढल्यास त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. वेळीच घेतलेली मदत तुमचे वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्य सुखी करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT