Viral video Blinkit Delivery Boy Misconduct Young Woman : ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर पीडित तरुणीने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर करत कंपनीकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही संतापजनक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तरुणीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत “देशात महिलांची सुरक्षा हा विनोद आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे .दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीला उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये ब्लिंकिटने दिलगिरी व्यक्त करत संबंधित डिलिव्हरी बॉयवर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
पीडितेने आपल्या पोस्टमध्ये घटनेचे वर्णन करताना लिहिले आहे, “आज ब्लिंकिटवरून ऑर्डर करताना माझ्यासोबत हे घडले. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा माझा पत्ता विचारला आणि नंतर मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. हे अजिबात मान्य नाही. कृपया कठोर कारवाई करा.” या घटनेमुळे संतप्त झालेल्या तरुणीने देशातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये, “भारतात महिलांची सुरक्षा हा विनोद आहे का?” असा थेट सवाल विचारला आहे.
डिलिव्हरी बॉयने केलेला हा घृणास्पद प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरुणीच्या पोस्टनंतर ही घटना साेशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. नेटकऱ्यांनी आरोपीवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डिलिव्हरी बॉयने तरुणीसोबत केलेल्या गैरवर्तनाची घटना समोर आल्यानंतर ब्लिंकिटने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. पीडित तरुणीने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट केल्यानंतर काही तासांतच कंपनीने आपल्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून प्रतिक्रिया दिली. पीडित तरुणीला उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये ब्लिंकिटने दिलगिरी व्यक्त केली आहे. फोनवर तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल आम्ही आभारी आहोत. या घटनेबद्दल आम्हाला खरोखरच वाईट वाटते. हे किती अस्वस्थ करणारे आहे हे आम्हाला समजते. कृपया खात्री बाळगा की, चर्चेनुसार आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे." कंपनीने पीडित तरुणीला पुढील कोणत्याही मदतीसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पुढील प्रश्नांसाठी किंवा मदतीसाठी थेट संदेश पाठवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मात्र, नेमकी कोणती कारवाई करण्यात आली आहे, हे स्पष्ट केलेले नाही.