woman reaches police station with dead rat in polybag complaint leaves police surprised
पुढारी ऑनलाईन : असे म्हटले जाते की जगात आपण काहीही निवडू शकतो मात्र शेजारी कोण राहणार हे आपण निवडू शकत नाही. हे म्हणण्याचे कारण शेजारी चांगला असला तर बर नाहीतर अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. तसाच एक प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडामधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला मृत उंदीर घेऊन थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. तिने तो पोलिसांसमोर ठेवत शेजाऱ्यांवर गंभीर आरोप केले. स्वतःला प्राणीप्रेमी सांगत तिने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.
नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीमधील शेजाऱ्यांतील वादाचे हे अनोखे प्रकरण आहे. सेक्टर-१३४ मधील कॉसमॉस सोसायटीत राहणारी एक महिला मृत उंदीर घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचली आणि शेजारी तिच्या घराबाहेर उंदीर टाकत असल्याचा आरोप केला.
महिलेची तक्रार ऐकून पोलिस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. सोसायटीतील रहिवासी तमन्ना हिने पोलिसांना सांगितले की, तिचा शेजारी तिला त्रास देण्यासाठी अनेक दिवसांपासून फ्लॅटच्या बाहेर मृत उंदीर टाकत आहे.
सुरुवातीला तिने हा प्रकार दुर्लक्षित केला, मात्र वारंवार असे घडू लागल्याने ती संतप्त झाली. शनिवारी तिने मृत उंदीर पॉलिथिनमध्ये पॅक करून पोलिस ठाण्यात नेला आणि पोलिसांसमोर ठेवला.
दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासूनच वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेने स्वतःला प्राणीप्रेमी असल्याचे सांगत, प्राण्यांना मारून अशा प्रकारे फेकणे अमानवीय असल्याचे म्हटले. पोलिसांनी तिला समजावले की कारवाईसाठी लेखी तक्रार देणे आवश्यक आहे. जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर महिला पुन्हा सोसायटीत परतली.
घटनेची माहिती मिळताच सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर चर्चेला उधाण आले. काही रहिवाशांनी या प्रकाराला ‘रॅट वॉर’ असे नावही दिले. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासून वाद सुरू होता.
“आतापर्यंत कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे पोलीस निरीक्षक अमित खारी यांनी सांगितले.