महिलेने रात्री एका वस्तूची दिली ऑर्डर, डिलिव्हरी बॉयला आला संशय, ग्राहकाचा वाचला जीव File Photo
राष्ट्रीय

महिलेने रात्री एका वस्तूची दिली ऑर्डर, डिलिव्हरी बॉयला आला संशय, ग्राहकाचा वाचला जीव

डिलिव्हरी बॉयला ऑर्डरमध्ये अशी एक वस्तू दिसली की त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला.

पुढारी वृत्तसेवा

woman orders rat killer at night delivery boy feels danger

पुढारी ऑनलाईन :

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका डिलिव्हरी बॉयने असा दावा केला आहे की, त्याने एका महिलेचा जीव वाचवला. रात्री उशिरा एका महिलेने उंदीर मारण्याची विषारी औषध ऑर्डर केली होती, मात्र ती तिला डिलिव्हर करण्यात आली नाही.

रात्रीच्या शांततेत केलेल्या एका छोट्याशा ऑनलाईन ऑर्डरमुळे एका महिलेचे आयुष्य वाचले. डिलिव्हरी बॉयला ऑर्डरमध्ये अशी एक वस्तू दिसली की त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. ही बाब हलक्यात न घेता त्याने हुशारी दाखवली आणि अशा प्रकारे त्या महिलेचा जीव वाचला. हा प्रकार तामिळनाडूमधील असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय सांगतो की, एका महिलेने रात्री उशिरा उंदीर मारण्याचे औषध ऑर्डर केले होते. कंपनीला ऑर्डर मिळाल्यानंतर ती डिलिव्हरी बॉयकडे देण्यात आली. मात्र त्यानंतर जे घडले ते थक्क करणारे आहे.

नेमके काय घडले?

डिलिव्हरी बॉयने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की, तो जेव्हा उंदीर मारण्याचे औषध घेवून डिलिव्हर करण्यासाठी त्या महिलेच्या घरी पोहोचला, तेव्हा ती महिला खूपच अस्वस्थ होती आणि रडत होती. त्याच क्षणी त्याला वाटले की हे औषध एखाद्या चुकीच्या कारणासाठी मागवली असावी. संशय बळावल्याने त्याने ती वस्तू देण्यास नकार दिला आणि ती परत घेऊन तो निघून गेला.

महिलेने नाकारली गोष्ट

या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय पुढे सांगतो की, जेव्हा त्याने ऑर्डर देण्यास नकार दिला तेव्हा महिलेने कारण विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, तुमच्यासोबत काही अनर्थ होऊ शकतो. तुम्ही खूपच अस्वस्थ दिसत आहात आणि रडत आहात. असे वाटते की तुम्ही जीवन संपवण्याचा प्रयत्न करू शकता. यावर महिला म्हणाली की ती असे काही करणार नाही. तरीही डिलिव्हरी बॉयने हे सांगून वस्तू दिली नाही की तुम्ही उद्या सकाळी पुन्हा ऑर्डर करू शकता.

उंदीर मारण्याचे औषध विकणे किती सोपे आहे?

भारतामध्ये उंदीर मारण्याच्या औषधांचा समावेश कीटकनाशक कायदा, 1968 आणि कीटकनाशक नियम, 1971 अंतर्गत केला जातो. अशा प्रकारच्या औषधाची विक्री करण्यासाठी सेंट्रल इन्सेक्टिसाइड्स बोर्ड अँड रजिस्ट्रेशन कमिटीमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच, असे औषध विकणाऱ्या दुकानदाराला राज्य सरकारकडून परवाना घेणेही आवश्यक असते. मात्र, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काही अटींच्या अधीन राहून या औषधांची सर्रास विक्री केली जाते.

लोक करत आहेत भरभरून कौतुक

हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोक डिलिव्हरी बॉयचे भरभरून कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, जर रोबोट असता तर तो सरळ डिलिव्हरी करून गेला असता. तर दुसऱ्याने म्हटले की, त्याने केवळ ऑर्डर नाही तर एक माणूस पाहिला. ही घटना डिलिव्हरी बॉयने त्‍याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. ही गोष्ट वाचकांपर्यत पोहोचविणे इतकाच हेतू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT