Fake Divorce Case
ग्वाल्हेर : पती-पत्नीच्या नात्यात पडलेली ठिणगी कधी संसाराची राखरांगोळी करते. दाम्पत्याच्या नात्यात दुरावा आला की घटस्फोट होतो, हे समजू शकते; पण घटस्फोट मिळवण्यासाठी कुणी इतक्या खालच्या थराला जाऊ शकतं? आपल्या सख्ख्या नणंदेलाच 'सवत' ठरवून एका पत्नीने पतीपासून काडीमोड घेतला! मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये घटस्फोटासाठी घडलेल्या या फसवणुकीच्या प्रकाराने माणुसकीलाच काळिमा फासला आहे. या संतापजनक प्रकारामुळे हादरलेल्या पतीने आता न्यायासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेल्या महिलेचा विवाह १९९८ मध्ये एका मार्केटिंग कंपनीत काम करणाऱ्या तरुणाशी झाला. पती कामानिमित्त वारंवार घराबाहेर राहत असल्याने दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. २०१५ पासून ही महिला पतीपासून वेगळी राहू लागली होती. महिलेची घटस्फोट घेण्याची तीव्र इच्छा होती, मात्र पती याला तयार नव्हता. २०२१ मध्ये तिने कौटुंबिक न्यायालयात धाव घेत पतीचे दुसरे लग्न झाल्याचा आरोप केला आणि घटस्फोटाची मागणी केली.
पुराव्याचा भाग म्हणून महिलेने न्यायालयात एक कौटुंबिक फोटो सादर केला. या फोटोमध्ये तिचा पती त्याच्या बहिणीसह आणि इतर नातेवाईकांसोबत उभा होता. फोटोत पतीच्या शेजारी उभी असलेली महिला ही त्याची दुसरी पत्नी असल्याचा दावा पत्नीने कौटुंबिक न्यायालयात केला. या पुराव्यांच्या आधारे ग्वाल्हेर कौटुंबिक न्यायालयाने महिलेच्या बाजूने एकतर्फी घटस्फोटाचा आदेश दिला. या प्रक्रियेत पतीला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही आणि त्याच्या सहभागाशिवाय घटस्फोट मंजूर झाला.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा पतीला या घटस्फोटाच्या आदेशाबद्दल समजले, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. न्यायालयाचे रेकॉर्ड तपासल्यानंतर त्याला तो फोटो पाहून धक्काच बसला. ज्या महिलेला त्याची दुसरी पत्नी म्हणून ओळखले गेले होते, ती प्रत्यक्षात त्याची सख्खी बहीण होती.
सरकारी वकील धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले की, पतीने आता या एकतर्फी घटस्फोटाच्या आदेशाला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठात आव्हान दिले आहे. पत्नीने न्यायालयाची दिशाभूल करून आणि खोटा दावा करून घटस्फोट मिळवल्याचा आरोप पतीने केला आहे. उच्च न्यायालय आता या प्रकरणाची सुनावणी करत असून, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आधारित असलेला हा घटस्फोटाचा आदेश रद्द करण्याची विनंती पतीने केली आहे.