woman dies during childbirth Lucknow
लखनौ: वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथे पदवीधर आणि १२ वीच्या विद्यार्थ्याने मिळून एका महिलेवर चक्क 'सिझेरियन' शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बोगस डॉक्टरांना अटक केली आहे.
योगेश वर्मा (३२, रा. मालीपूर, बीए पदवीधर) आणि शुभम विश्वकर्मा (१९, रा. सुलतानपूर, १२ वीचा विद्यार्थी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बसखारी येथील 'नवजीवन हॉस्पिटल' हे अवैध रुग्णालय गेल्या पाच वर्षांपासून सुरू होते, असे तपासात उघड झाले आहे. या दोघांकडेही कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा शस्त्रक्रिया करण्याची पात्रता नव्हती.
प्रियांका असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, तिला ५ फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोघांनी प्रियांकावर सिझेरियन शस्त्रक्रिया केली, ज्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, शस्त्रक्रियेनंतर प्रियांकाला अतिरक्तस्त्राव झाला आणि भूल दिल्यानंतर ती शुद्धीवरच आली नाही. प्रकृती खालावल्याने तिला लखनौला हलवण्यात आले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तीव्र निदर्शने केली. यामुळे रुग्णालयाची चालक 'रुबी' ही तिथून पळून गेली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
योगेश वर्माचे वडील एका आरोग्य केंद्रात वॉर्ड बॉय होते, त्यांच्यासोबत काम करताना तो साध्या वैद्यकीय प्रक्रिया शिकला होता. दुसरा आरोपी शुभम हा सुलतानपूरमधील एका नर्सिंग होमशी संबंधित होता, तिथे पाहून त्याने अनुभव घेतला होता. हे दोघे एका सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी फक्त ३,००० ते ५,००० रुपये घेत असत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या तुलनेत ही फी अत्यंत कमी असल्याने गरीब रुग्ण त्यांच्याकडे आकर्षित होत होते.
मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ८ फेब्रुवारीच्या रात्री या रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. एका निवासी इमारतीच्या चार खोल्यांमध्ये हे रुग्णालय बेकायदेशीरपणे चालवले जात होते. तिथे अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र किंवा बायोमेडिकल कचरा व्यवस्थापनाची कोणतीही सोय नव्हती. अधिकाऱ्यांनी या सर्व खोल्या सील केल्या आहेत. हे आरोपी इतर कोणत्या रुग्णालयांत शस्त्रक्रिया करत होते का याचाही तपास पोलिस करत आहेत.