नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 14 विधेयके पटलावर येणार असून यात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी मतदार यादीच्या विशेष पडताळणी, प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अनेक विषयांवर चर्चेची मागणी लावून धरली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याचे आवाहन केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह विरोधी पक्षातील नेते बैठकीला उपस्थित होते.
सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रिजिजू म्हणाले, संसदेचे कामकाज ठप्प होऊ नये. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सरकार सर्व पक्षांशी चर्चा करत राहील. एसआयआरवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी मान्य झाली आहे का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अधिवेशनाचा अजेंडा संध्याकाळी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवला जाईल.
चर्चेसाठी विरोधक आक्रमक
तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी सरकारने एसआयआरसारख्या मुद्द्यांवर चर्चेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी या बैठकीला केवळ औपचारिकता म्हटले आहे. काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी राष्ट्रीय सुरक्षा, हवेचे प्रदूषण, मतदार यादीची शुद्धता आणि शेतकरी समस्या यावर चर्चेची मागणी केली आहे.
शिवसेनेकडून नरेश मस्के सहभागी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत शिंदेंऐवजी खा. नरेश मस्के यांनी बैठकीला हजेरी लावली. परंतु राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षाकडून कोणीही बैठकीला उपस्थित नव्हते. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील प्रचारात व्यस्त असल्याने बैठकीला येऊ शकले नाहीत, असे स्पष्ट झाले.
कामकाज सुरळीत चालवण्याचे सरकारकडून विरोधकांना आवाहन
1) संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कामकाज सुरळीत चालवण्याची विनंती केली.
2) विरोधी पक्षांनी मतदार यादीच्या विशेष पडताळणीवर चर्चेसाठी दबाव आणला आहे.
3) एसआयआरवर चर्चा न झाल्यास कामकाज रोखण्याचा समाजवादी पक्षाचा इशारा.
4) हे अधिवेशन केवळ 15 दिवसांचे असून, काँग्रेसने याला औपचारिकता म्हटले आहे.