BSF Jawan Bangladesh Border Incident Video Pudhari
राष्ट्रीय

BSF Jawan Bangladesh Border: ‘घरात घुसून मारेन!’ बांगलादेशींनी डिवचताच भारतीय जवान संतापला; थेट सीमाच ओलांडली, पुढे काय घडलं?

BSF Jawan Bangladesh Border Incident: बांगलादेशी नागरिकांनी डिवचल्यामुळे BSF जवानाने संतापून भारत-बांगलादेश सीमा ओलांडल्याचा दावा एका व्हिडिओतून करण्यात आला आहे.

Rahul Shelke

BSF Jawan Bangladesh Border Incident: भारत-बांगलादेश सीमेवर एक धक्कादायक घटना घडली आहे. बांगलादेशी नागरिकांनी डिवचल्यामुळे सीमा सुरक्षा दलाचा (BSF) एक जवान संतापला आणि त्यानंतर त्याने थेट बांगलादेशची सीमा ओलांडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही बांगलादेशी नागरिक जवानाला बोलताना दिसत आहेत. त्यावर संतापलेल्या जवानाने ‘घरात घुसून मारेन’ असे उत्तर दिल्याचे ऐकू येते. त्यानंतर जवान बांबूंपासून तयार केलेली सीमारेषा ओलांडून बांगलादेशच्या हद्दीत जाताना दिसतो.

बांगलादेशींनी जवानाला डिवचल्याचा दावा

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, काही बांगलादेशी नागरिक BSF जवानाला स्थानिक भाषेतून बोलत असल्याचे दिसते. यावर जवान संतापून त्यांना प्रत्युत्तर देतो. ‘मला आव्हान देतोय? आव्हान दिलंस तर घरात घुसून मारेन,’ असे तो म्हणताना ऐकू येतं. त्यानंतर तो बांबूंपासून तयार केलेली सीमारेषा ओलांडून पुढे जातो.

या घटनेनंतर बांगलादेशच्या बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) या सुरक्षा दलाने संबंधित जवानाला ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले. मात्र, आता त्या जवानाची सुटका करण्यात आली असून तो भारतात परतल्याची माहिती आहे. जवानाची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

बांगलादेशच्या हद्दीत २०० यार्ड आत गेल्याचा आरोप

बांगलादेशमधील 'प्रथम आलो' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. सिल्हेटमधील गोवाइनघाट उपजिल्ह्यातील बिच्छनाकांडी सीमावर्ती भागात ही घटना घडल्याचे वृत्त आहे.

BGB च्या पथकाला बिच्छनाकांडी परिसरात एक भारतीय BSF जवान शस्त्रांसह दिसला. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. संबंधित जवान बांगलादेशच्या हद्दीत सुमारे २०० यार्ड आत आल्याचा दावा BGB च्या सूत्रांनी केला आहे.

बिच्छनाकांडी सीमा चौकी परिसरातील घटना

'प्रथम आलो'च्या वृत्तानुसार, सिल्हेट बटालियन (४८ BGB) चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल नूर उद्दीन अहमद यांनी या घटनेला दुजोरा दिला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या BSF जवानाला BGB च्या बिच्छनाकांडी सीमा चौकीच्या छावणीत नेण्यात आले होते.

त्याच्याकडील शस्त्रही तिथे ठेवण्यात आले होते. दरम्यान, संबंधित जवानाची सुटका होऊन तो भारतात परतल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT