Wildflowering Dating Trend Gen Z Relationships 2026
नवी दिल्ली: डिजिटल युगातील डेटिंग म्हणजे केवळ इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करणे किंवा एकमेकांचे सोशल मीडिया स्टेटस वाढवणे इतकेच मर्यादित राहिले होते. 'रिलेशनशिप'मध्ये जाण्यासाठी लागलेली जणू एक स्पर्धाच गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाली. मात्र, २०२६ मध्ये हे चित्र बदलताना दिसत आहे. कारण, Gen Z च्या प्रेमात पडण्याच्या पद्धतीत बदल घडवणारा वाइल्डफ्लॉवरिंग हा डेटिंग ट्रेंड सध्या सुरू आहे.
पूर्वी डेटिंगमध्ये "आपण नक्की कोण आहोत?" किंवा "लग्नाचं काय?" असे प्रश्न लगेच विचारले जायचे. पण 'जेन झी' पिढी नात्याला कोणतेही नाव देण्याची घाई करत नाही. जशी रानफुले कोणत्याही बाह्य दबावाशिवाय, नैसर्गिकरीत्या आणि स्वतःच्या गतीने उमलतात, तसेच नात्याला फुलू देणे म्हणजे 'वाईल्डफ्लॉवरिंग'.
या ट्रेंडमध्ये तरुण-तरुणी नात्याला कोणतेही नाव देण्यापूर्वी त्यातील भावनिक खोली तपासण्यावर भर देत आहेत. 'क्वॅकक्वॅक' या डेटिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ रवी मित्तल यांच्या मते, "डेटिंगच्या जगात हे वळण महत्त्वाचे आहे. कोणतीही मोठी वचन न देता केवळ ओळखीच्या पलीकडे जाऊन एकमेकांना समजून घेण्यावर आता तरुणाईचा भर आहे."
आजवर 'सिच्युएशनशिप', 'ब्रेडक्रंबिंग' किंवा 'घोस्टिंग' यांसारख्या शब्दांनी डेटिंगचे जग व्यापले होते. त्यातच ठराविक दिवसांत नात्याची व्याख्या स्पष्ट करण्याचा दबाव तरुणांवर असायचा. 'वाईल्डफ्लॉवरिंग'मुळे हा दबाव कमी झाला आहे. आता तरुण 'परफेक्ट बायो' शोधण्याच्या मागे लागत नाहीत. मेसेजला लगेच रिप्लाय देऊ नये किंवा एका महिन्यात नाते जाहीर करावे, असे जुने संकेत आता मागे पडत आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अटींवर आणि स्वतःच्या गतीने नाते पुढे नेत आहे.
एकदा असा समज होता की डेटिंग ॲप्समुळे नात्यांची गती वाढली आहे, मात्र रवी मित्तल यांनी हा दावा खोडून काढला. त्यांच्या मते, व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म्समुळे तरुणांना घाई न करता शांतपणे समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. जोपर्यंत आपण स्वतःला नीट ओळखत नाही, तोपर्यंत दुसऱ्याशी बांधले जाणे कठीण आहे, हा विचार आता प्रबळ होत आहे.
'जेन झी' पिढी आता केवळ जोडीदाराच्या शोधात नाही, तर या प्रवासात 'स्व-प्रेम' जपणेही तितकेच महत्त्वाचे मानत आहे. हाच सल्ला आता मिलेनियल्सनाही भावत आहे. तज्ज्ञांच्या मते, डिजिटल युगात डेटिंग खूप फास्ट झाले होते. त्यामुळे मानसिक ताण वाढला होता. आता तरुण मुले-मुली परफेक्ट जोडीदार शोधण्यापेक्षा खऱ्या आणि भावनिक नात्याला जास्त महत्त्व देत आहेत. एकंदरीत २०२६ मधील डेटिंग हे दबावाचे नसून, रानफुलांसारखे मुक्तपणे बहरण्याचे माध्यम बनत आहे.