Crime News
लखनऊ: प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून गुपचूप अंत्यसंस्कार करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. शिक्षेचे स्वरूप १६ जानेवारी रोजी स्पष्ट होईल. दोषी ठरवल्यानंतर दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे. लखनऊमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात दोन वर्षांच्या मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. तिने सांगितले होते की, सोबत आलेल्या अंकलने ग्लासमध्ये काहीतरी मिसळले आणि आईने ते वडिलांना पाजले.
किदवई नगर येथील प्रतीक कुमार याचा विवाह २०१७ मध्ये नेहा शर्माशी झाला होता. ६ मार्च २०२४ रोजी नेहा पती प्रतीक आणि दोन मुलांसह (५ वर्षांची मान्या आणि ३ वर्षांचा अभिराज) माहेरी फैजाबादला गेले होते. १२ मार्च रोजी नेहा मुलांसह परतली, पण प्रतीक आला नाही. प्रतिकच्या वडिलांनी विचारणा केल्यावर तिने सांगितले की, गाडी खराब झाल्यामुळे तो दोन-तीन दिवसात येईल. मात्र, प्रतीकशी संपर्क होऊ शकला नाही. १६ मार्च रोजी नेहा औषध आणण्याच्या बहाण्याने दोन्ही मुलांना घेऊन घरातून निघून गेली ती पुन्हा परतलीच नाही. त्यानंतर प्रतिकचे वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तपासादरम्यान समोर आले की, नेहाचे प्रतीकचा मित्र आयुष याच्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी कट रचून प्रतीकला लखनऊला नेले, तिथे त्याला विष दिले आणि तिथेच त्याचे अंत्यसंस्कारही उरकले.
पोलिसांनी सांगितले की, प्रतीक आणि आयुष दोघेही मेडिकल क्षेत्राशी संबंधित होते. यादरम्यान नेहा आणि आयुष जवळ आले. त्यांनी प्रतीकला फैजाबादला नेण्याच्या बहाण्याने लखनऊमधील एका हॉटेलमध्ये थांबवले. तिथे दारूमध्ये विष मिसळून त्याला पाजले. प्रकृती बिघडल्यावर आयुषने प्रतीकचा चुलत भाऊ असल्याचे सांगून त्याला रुग्णालयात दाखल केले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पंचनाम्यातही नेहा आणि आयुष या दोघांची नावे साक्षीदार म्हणून होती.
प्रतिकची दुसरीत शिकणारी मुलगी घटनेच्या वेळी हॉटेलमध्येच होती. न्यायालयात तिची साक्ष नोंदवण्यात आली. मुलीने सांगितले की, "आम्ही मम्मी, पापा आणि भावासोबत लखनऊला गेलो होतो. आयुष अंकलही सोबत होते. एक दिवस मी ब्लँकेटमधून पाहिले की, आयुष अंकलने ग्लासमध्ये पांढरी पावडर मिसळली आणि झोपलेल्या पापांना आईने ते पाजले. त्यानंतर पापांच्या घोरण्याचा आवाज बंद झाला." चिमुरडीच्या या विधानाने आरोपींना दोषी ठरवण्यात मोठी भूमिका बजावली.
नेहा मुलांसह आयुषसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. १७ एप्रिल रोजी दोघे किदवई नगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. आयुष प्रतीकचा मोबाईल वापरत होता आणि मेसेजद्वारे घरच्यांच्या संपर्कात राहून दिशाभूल करत होता. पोलिसांनी मोबाईल जप्त केल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.