Sonia Gandhi
नवी दिल्ली : २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) विजय मिळवल्यानंतर सोनिया गांधी पंतप्रधान होतील, अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाला पसंती दिली. तब्बल दोन दशकांनंतर सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्रातून या महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयामागील कारणांचा खुलासा केला आहे.
‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात त्यांनी त्यावेळच्या घडामोडी, राहुल गांधी यांच्याशी झालेला संवाद आणि मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड करण्यामागील भूमिका सविस्तर मांडली आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्रात २००४ मध्ये पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय कसा घेतला, याचा उल्लेख केला आहे. सुरुवातीला त्यांच्या मनात काही संभ्रम होता. मात्र, अखेर त्यांनी अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाबाबतचा एक उतारा त्यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे. त्यात त्या लिहितात, "अचानक माझ्या मनातील शेवटच्या शंकेचेही निरसन झाले. 'सोनिया, स्वतःशी प्रामाणिक राहा,' असा आवाज मला माझ्याच मनातून ऐकू आला. तुला हे नेहमीच माहीत होते. आता हा विषय इथेच संपव."
या निर्णयानंतर काही तासांनी सोनिया गांधी जाग्या झाल्या आणि थेट मुलगा राहुल गांधी यांच्या खोलीत गेल्या. त्यांनी दरवाजा ठोठावून आपला निर्णय राहुल यांना सांगितला. त्या म्हणतात, "मी माझा निर्णय घेतला आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे," असे मी राहुलला सांगितले. त्यानंतर राहुल माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला मिठी मारत, 'हा योग्य निर्णय आहे,' असे सांगितले.
निर्णय निश्चित झाल्यानंतर सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत परतल्या. सभागृहात प्रवेश करताच उपस्थित खासदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. अनेक खासदार आपल्या जागेवर उभे राहून टेबल वाजवत होते. या प्रसंगाचे वर्णनही त्यांनी आत्मचरित्रात केले आहे.
पंतप्रधानपद स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेतल्यानंतर सोनिया गांधी यांच्यासमोर नव्या सरकारचे नेतृत्व कोणाकडे सोपवायचे, हा प्रश्न होता. काँग्रेसमध्ये अनेक अनुभवी आणि सक्षम नेते होते. मात्र, डॉ. मनमोहन सिंग हे या पदासाठी सर्वाधिक योग्य असल्याचे त्यांना वाटत होते.
सोनिया गांधी लिहितात, "पंतप्रधानपदासाठी पात्र असलेले अनेक ज्येष्ठ सहकारी पक्षात होते. त्यांच्यापैकी काही जण हे पद स्वीकारण्यासही तयार झाले असते. मात्र, माझ्या नजरेत एक अशी व्यक्ती होती, जिच्या चारित्र्यावर कोणतीही शंका नव्हती आणि जिला प्रशासन व शासनव्यवस्थेचे सखोल ज्ञान होते. ते म्हणजे डॉ. मनमोहन सिंग."
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या अनुभवाचा विचार करून सोनिया गांधी यांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी योग्य मानले. याशिवाय, यूपीए सरकारला डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळणार होता. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग यांची निवड केल्यास सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन होईल, असे सोनिया गांधी यांना वाटत होते.
मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक आयुष्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबमधील एका गावातून ऑक्सफर्ड आणि केंब्रिजसारख्या नामांकित विद्यापीठांपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय होता. अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय अनुभव आणि तंत्रज्ञानविषयक ज्ञान यांसोबतच त्यांचा संवेदनशील स्वभाव सोनिया गांधी यांना भावला होता. त्या लिहितात, "डॉ. सिंग यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामगिरीव्यतिरिक्त मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे त्यांचे दयाळू आणि संवेदनशील मन. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणतीही शंका नव्हती."
मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित हातात असेल, याची त्यांना खात्री होती. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मनमोहन सिंग यांचे नाव सुचवले. त्यांच्या या प्रस्तावाला कोणत्याही नेत्याने विरोध केला नाही. त्यानंतर सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्याशी वैयक्तिकरीत्या चर्चा केली. सुरुवातीला त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला; मात्र नंतर त्यांची समजूत काढण्यात आली आणि त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली.
सोनिया गांधी यांनी १८ मे २००४ रोजीच्या घडामोडींचाही आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. यूपीए सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी त्या डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. राष्ट्रपती भवनात प्रवेश करताना त्यांना जुन्या आठवणींनी भावूक केले. यापूर्वी त्या आपल्या सासू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच पती राजीव गांधी यांच्यासोबत अनेकदा या ठिकाणी आल्या होत्या. मात्र, यावेळी तिथे येण्यामागचा उद्देश वेगळा होता.
त्या लिहितात, "आमच्या गाड्या राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच माझ्या मनात भावनांचा कल्लोळ निर्माण झाला. यापूर्वी मी अनेकदा माझ्या सासूबाई आणि राजीव यांच्यासोबत इथे आले होते. मात्र, यावेळी मी वेगळ्याच उद्देशाने राष्ट्रपती भवनाच्या लांबच लांब आणि अंधाऱ्या मार्गिकांमधून जात होते."
राष्ट्रपती भवनातील भेटीनंतर दोघेही दिल्लीतील १० जनपथ येथील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी परतले. या प्रवासादरम्यान किंवा त्याआधीही त्यांनी मनमोहन सिंग यांच्याशी पंतप्रधानपदाबाबत कोणतीही चर्चा केली नव्हती. मनमोहन सिंग यांच्यासह सर्वांनाच सोनिया गांधी पंतप्रधान होणार, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय त्यावेळी मनमोहन सिंग यांना सांगितला नव्हता, असेही त्यांनी नमूद केले आहे.
सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात प्रणव मुखर्जी यांच्याबाबतही एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. २०१० मध्ये त्यांच्याशी झालेल्या एका चर्चेदरम्यान प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान होण्याची आपली अनेक वर्षांपासूनची इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. "आता नेतृत्वात बदल करण्याची वेळ आली आहे," असे संकेत त्यांनी दिल्याचे सोनिया गांधी यांनी पुस्तकात म्हटले आहे.
यूपीए सरकारच्या काळात आपण 'बॅकसीट ड्रायव्हर' म्हणजेच पडद्यामागून सरकार चालवणाऱ्या नेत्या होतो, अशी टीका सोनिया गांधी यांनी फेटाळली आहे. पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्या पदाचा आणि अधिकारांचा आपण नेहमीच आदर केला. मतभेद असले तरी त्यांच्या निर्णयाला महत्त्व देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांना वाटत होते. त्या लिहितात, "आमच्या विरोधकांना आनंद साजरा करण्याची आणि सरकार कमकुवत करण्याची संधी मिळेल, असा कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, याची मी नेहमीच काळजी घेतली."
‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात सोनिया गांधी यांनी इटलीतील बालपणापासून ते भारतातील आयुष्यापर्यंतचा प्रवास उलगडला आहे. युद्धानंतरच्या इटलीतील त्यांचे बालपण, शिक्षणासाठी इंग्लंडमधील केंब्रिज येथे वास्तव्य आणि राजीव गांधी यांच्याशी झालेली पहिली भेट, अशा अनेक आठवणी त्यांनी पुस्तकात मांडल्या आहेत.
१९६५ मध्ये त्या १९ वर्षांच्या असताना केंब्रिजमध्ये त्यांची राजीव गांधी यांच्याशी भेट झाली. त्यानंतर २५ फेब्रुवारी १९६८ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. भारतात आल्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी झालेली ओळख, भारतीय संस्कृतीशी जुळवून घेण्याचे प्रयत्न, हिंदी भाषा शिकणे, साडी नेसणे आणि भारतीय खाद्यसंस्कृती स्वीकारणे, अशा वैयक्तिक अनुभवांचाही या आत्मचरित्रात समावेश आहे.