Ajeet Bharti questioned by Police over SC incident : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सर्वोच्च न्यायालयात घडली. या प्रकरणी सोशल मीडियावर टिप्पणी केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी मंगळवारी (दि. ७) यूट्यूबर अजित भारती (Ajeet Bharti) याची चौकशी केली आहे. जाणून घेऊया पोलिसांच्या रडारवर आलेल्या अजित भारती याविषयी...
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, अजित भारती यांनी त्यांच्या पॉडकास्टदरम्यान म्हटले होते की, "गवई यांच्या मनात हिंदूविरोधी भावना आहेत. त्यांनी हिंदूविरोधी टिप्पणी करणे सुरू ठेवले, तर आज कोर्टरूममध्ये झाले तसेच रस्त्यावरही त्यांच्या सोबत घडू शकते."तसेच त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर क्लिप शेअर करत लिहिले की,“ज्यांना वाटते की मी तुमच्या टोळीला घाबरतो, त्यांनी आजचा लाईव्ह नक्की पाहा!गवई यांच्याविरुद्ध अवमानाचा खटला दाखल केला पाहिजे.”
यूट्यूबर अजित भारती याने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीची नोएडा पोलिसांनी गंभीर दखल घेतली. नोएडा पोलिसांनी सांगितले की, त्याला प्रथम सेक्टर ५८ पोलिस स्टेशनमध्ये आणि नंतर १२/२२ चौकीतील डीसीपी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. त्याने ‘X’ वर केलेल्या पोस्टबद्दल चौकशीसाठी त्याला बोलवण्यात आले. याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
भारतीने दावा केला की, त्याला सोशल मीडिया पोस्टपैकी एकाच्या संदर्भातच पोलिस चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीनंतर भारतीने ‘X’ वर म्हटले की, "मी ठीक आहे. अटक करण्यात आलेली नाही. सरकार आमचं आहे; व्यवस्था आमची आहे." भारतीने ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उशिरा हिंदीमध्ये पोस्ट केलं.त्या आधी, आणखी एक ‘X’ पोस्ट लिहिली:“संपूर्ण व्यवस्था माझ्या विरोधात असती, तर मी कॉफी, भाजलेले बदाम आणि काजू खाऊन बाहेर फिरत नसतो. संपूर्ण व्यवस्था माझ्यासोबत आहे. म्हणजेच तुमची व्यवस्था — आमच्या विचारांची व्यवस्था.मतभेद होत राहतील; पण आम्ही सर्व एक आहोत, आहोत आणि राहू. मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. जय श्रीराम!”
अजित भारती याचे ‘X’ आणि यूट्यूबवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून तो सरन्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पण्या करत आहे.दरम्यान, मिशन आंबेडकरचे संस्थापक आणि कार्यकर्ते सूरज कुमार बौद्ध यांनी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना पत्र लिहून सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल भारती आणि एका धार्मिक वक्त्याविरुद्ध फौजदारी अवमानना कारवाई सुरू करण्याची संमती मागितली आहे."ही विधाने आणि कृती भारताचे माननीय सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशाने आहेत. अशा सार्वजनिक चिथावणीचा सूर आणि स्वरूप अत्यंत धोकादायक आहे आणि या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, ज्यामुळे जोरदार वादविवाद निर्माण झाले आहेत आणि तणाव वाढला आहे," असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.