RAF Officer Sonia Sehrawat Pudhari
राष्ट्रीय

Sonia Sehrawat: 'कॉकरोच कधीच मरत नाहीत...' RAF अधिकारी सोनिया सेहरावत कोण? त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे उडाली खळबळ

RAF Officer Sonia Sehrawat: संसद मोर्च्यानंतर RAF अधिकारी सोनिया सहरावत यांच्या नावाने व्हायरल झालेल्या कथित इन्स्टाग्राम स्टोरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

RAF Officer Sonia Sehrawat: दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (RAF) सहाय्यक कमांडंट सोनिया सहरावत या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. संसद मोर्च्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नावाने एक स्क्रीनशॉट व्हायरल होत असून, त्यावरून CJP आणि काही विरोधी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवरून वाद

माध्यमांतील वृत्तांनुसार, संसद मोर्च्यानंतर सोनिया सहरावत यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर करण्यात आले होते. त्यामध्ये "स्वतःला सुधारू शकत नाहीत आणि देश सुधारण्याची भाषा करतात" असा मजकूर असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही स्टोरी नंतर हटवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. ही पोस्ट आंदोलनकर्त्यांचा अपमान करणारी असल्याचा आरोप करत CJP ने याचा निषेध केला आहे.

CJP चा आरोप

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना CJP ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत म्हटले की, संबंधित RAF अधिकारी आंदोलनकर्त्यांकडे 'कॉकरोच' म्हणून पाहत आहेत आणि पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत असल्याचे या पोस्टवरून दिसते. CJP ने आपल्या पोस्टमध्ये, "आम्ही कॉकरोच आहोत आणि कॉकरोच कधीच मरत नाहीत," असे म्हणत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली.

महुआ मोइत्रा यांचीही प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही या कथित इन्स्टाग्राम स्टोरीवर आक्षेप घेतला. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करत, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपमान झाल्याचा आरोप केला.

अभिजीत दीपके यांनीही उपस्थित केले प्रश्न

20 जुलै रोजी संसद मोर्चादरम्यान CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही सोनिया सहरावत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून, महिला आंदोलनकर्त्यांवर पुरुष सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून बळाचा वापर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला.

एका महिला आंदोलनकर्तीने मारहाण झाल्याचा आणि गैरवर्तन झाल्याचा आरोप केल्याचा उल्लेख करत, "महिला अधिकारी म्हणून अशा कारवाईला तुम्ही समर्थन देता का?" असा सवाल त्यांनी केला होता.

या प्रकरणात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटबाबत किंवा कथित इन्स्टाग्राम स्टोरीबाबत RAF किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता आणि संपूर्ण पार्श्वभूमी अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून, आंदोलन, पोलिस कारवाई आणि सुरक्षा दलांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

SCROLL FOR NEXT