Dr. Ajay Kumar Appointment UPSC Chairman
नवी दिल्ली: माजी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २९ एप्रिल रोजी प्रीती सुदान यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर यूपीएससीचे अध्यक्षपद रिक्त झाले. त्यामुळे अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजय कुमार यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर सरकारने घोषणा केली.
डॉ. अजय कुमार १९८५ च्या केरळ कॅडरचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. आयआयटी कानपूरचे ते माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी प्रमुख संरक्षण सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांचे भारतातील डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रांच्या उभारणीत मोठे योगदान आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले की, डॉ. अजय कुमार यांचा कार्यकाळ, यूपीएससीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सुरू होईल. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी भारतीय संविधानाच्या कलम ३१६(२) नुसार असेल. सेवाशर्ती यूपीएससी (सदस्य) नियमावली, १९६९ नुसार असतील, असे सरकारने आदेशात म्हटले आहे.
अजय कुमार यांनी अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पीएचडी आणि उपयोजित अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत त्यांनी देशाचे संरक्षण सचिव म्हणून काम केले. या काळात त्यांनी अग्निवीर भरती योजना आणि ऑर्डनन्स फॅक्टरीचे कॉर्पोरेटायझेशन यासारख्या प्रमुख संरक्षण सुधारणांचे नेतृत्व केले. त्यांनी भारताला संरक्षणात अधिक स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भर भारत उपक्रमालाही पाठिंबा दिला.
संरक्षण क्षेत्राव्यतिरिक्त, त्यांनी अनेक डिजिटल इंडिया प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यूपीआय, आधार, आणि सरकारी ई-मार्केटप्लेसच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी २०१२ च्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाद्वारे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल उत्पादन क्षेत्राच्या वाढीस मदत केली. त्यांनी कुमार यांनी भाजप, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील अनेक सरकारांसोबत काम केले आहे.